नियम पाळणाऱ्यांसाठी असतात ? 

सामान्य असोत किंवा नेते-अभिनेते. जर कोणी नियमाचे उल्लंघन केले असेल तर त्याने दंड हा भरायलाच हवा. दंड म्हणून दिलेली शिक्षा मोठ्या मनाने मान्य केली पाहिजे. ती चूक तुमच्या चालकाने केलेली असो किंवा तुम्ही ! जरी चालकाने चूक केली असली तरी ती चूक माझीच आहे हे सांगण्याचे धाडस आपल्या नेत्या आणि अभिनेत्यांनी दाखवायला हवे !
नियम पाळणाऱ्यांसाठी असतात ? 

पुण्यातील दगडूशेठ गणपतीजवळ पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्याला पकडले आणि त्याच्याकडून दंड वसूल केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या पोलिसाने दंड भरलेल्या व्यक्तीला दोन शहानपणाच्या गोष्टी ऐकविल्या.

तो पोलिस म्हणाला, "" आपण नियमाचे उल्लंघन करता, दोष मात्र पोलिसांना देता. कारण पैसे भरावे लागले म्हणून. आपण भारतीय इतर देशाचे कौतुक करतो. आपल्या पेक्षा ते बरे असे म्हणतो. पण, आपण जर नियम पाळले तर आपला देशही भारी आहे हे का लक्षात घेतले जात नाही !'' 

हा ब्लॉग लिहिताना खरे तर त्या पोलिसाची आठवण झाली. वाहतुकीचे नियम न पाळल्याने काय होते. तर होत्याचे नव्हते होते. एखादा भीषण अपघात होतो आणि एखादे कुटुंबच संपते. हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांना किंमतही मोजावी लागते. अशा एक ना अनेक घटना दैनंदिन जीवनात घडत असतात. 

काही वर्षापूर्वी साताऱ्याजवळील खंबाटकी घाटातील अपघात असेल किंवा नुकतीच पोलादपुरजवळील घटना असेल. सलमानने बेधुंद होत फुटपाथवरील लोकांना चिरडणे असेल. "व्हीव्हीआयपी'च्या गाड्यांचे सारथ्य करणाऱ्या चालकांना आपण कोणी तरी चारचौघांपेक्षा वेगळे आहोत हा गैरसमज असतो.

विशेषत: राजकारण आणि बॉलिवूडमधील ग्लॅमर नेते, अभिनेत्यांचे चालक तर हवेतच असतात. आम्ही बड्या मंडळींकडे आहोत. त्यामुळेच आम्ही कसेही वागणार हे आलेच. नियम तोडला की पोलिस, आरटीओ अधिकारी यांना दोनशे, चारशे रुपये दंड म्हणून भरणे हे त्यांना भूषणावह वाटते. 

वाहतुकीचे नियम सर्व सामान्य माणसं पाळत असतात. चुकून जरी सिग्नल तोडला तर तो जो काही दंड असतो तो इमानेइतबारे भरत असतो. तर दुसरीकडे भाई, दादा, काका आदी नेत्यांचे शिलेदार असे दंड भरण्यास तयार नसतात. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर तो रुबाबात उभा राहतो, डोळ्यांवरील महागड्या गॉगलमधून पोलिसांकडे नजर टाकतो. आपल्या गॉडफादरला फोन करतो. पोलिसांच्या हातात देतो. तिकडून फोन येतो. माझा माणूस आहे. कार्यकर्ता आहे. सोडा त्याला! काहीवेळा दंड भरणे राहते दूरच. तो रुबाबात गाडीवर बसून निघून जातो.

खरे तर पोलिसांनी अशा भाईदादांना धडा शिकविणे अपेक्षित असते. तसे होत नाही. राजकारणामुळे पोलिसांचे हातही बांधले जातात. पुण्यातील बीआरटीमध्ये अशाच भाईंच्या गाड्या बिनधास्त घुसतात. त्याही भरधाव वेगात. पण, बोलणार कोण ? असो. 

मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे परिवहन खात्याचे मंत्री असलेल्या दिवाकर रावते यांचे नाव या यादीत यावे याचेही आश्‍चर्य वाटते. 

नेते असोत की अभिनेते ही मंडळी आपल्या आचरणाने समाजात आदर्श निर्माण करतात. जरी अनावधनाने नियम तोडले असले तरी ते मान्य करून हो ! मी चुकलो. 
! दंड भरण्यास तयार आहे अशी भूमिका घेणे गरजेचे आहे.

हे राहिले बाजूलाच. उलट ज्या गाडीचे नंबर जाहीर झाले ती गाडी आम्ही विकली किंवा चालकाने नियम मोडला असे उत्तर देऊन आपण कसे नियमांचे पालन करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.मध्यंतरी एका खासदाराने टोल नाक्‍यावर घातलेला धुडगूसही आठवत असेलच. अगदी टोलवरून टोले दिल्याची घटना घडली होती. 

आज मुंबई असो की पुणे. वाढत्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. गाड्या रॅश चालविणे, वेगावर मर्यादा नसणे, रोड सायन्स रोड सिग्नलचे नियम माहीत नसणे, सुरक्षित अंतर न ठेवणे. धोक्‍याच्या वळणावर दक्षता न घेणे. सिग्नल तोडणे यामुळे दररोज अपघात घडत असतात. दुचाकी, चारचाकी कशी चालवायला हवी याचे ज्ञान न घेणे यामुळे अपघात होतात आणि लोक जीव गमावून बसतात. 

सामान्यांनाबरोबरच नेते किंवा अभिनेत्यांनी वाहतुकीचे नियम हे पाळलेच पाहिजे. "व्हीआयपी' कल्चरमुळे तर शहरात अनेकवेळा सामान्य लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. "व्हीव्हीआयपी' मुळे वेळेवर रुग्णालयात दाखल न करता आल्याने रुग्णाला वाटेत अखेरचा श्‍वास घ्यावा लागला होता अशा घटनाही देशात घडल्या आहेत.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर एकदा आदेशच काढला होता की माझ्यामुळे ट्रॅफिक थांबवू नका. मला उशीर झाला तरी चालेल. लोकांना वेठीस धरू नका. बॅनर्जींचा आदर्श आपल्याकडील मंडळींनीही घ्यायला काही हरकत नाही. 

इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी महत्त्वाची अपॉइन्टमेंट साधण्यासाठी भुयारी रेल्वेने प्रवास केला होता. तेव्हा कोैतुकाने प्रवाशांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले होते. आपल्याकडे निवडणुका आल्या की नेते रेल्वेने प्रवास करतात. सोबत कार्यकर्त्यांना लवाजमा असतो. फोटोग्राफर असतात. हे फोटो काही वेळातच मीडियाकडे कसे पोचतात. ते कसे प्रसिद्ध होतात हे आपणास नवे नाही. परंतु, नेत्यांना आपण सर्वसामान्य नागरिक आहोत याचे भान कधी येणार हा प्रश्‍न आहेच. 

लोकशाहीत कायद्यासमोर सर्वजण समान हवेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन हे केलेच पाहिजे. अन्यथा नियम हे पाळणाऱ्यांसाठी असतात. ते तोडणाऱ्यांसाठी नसतात. म्हणजेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना शिक्षा. अप्रामाणिकांना बक्षीस असे होता कामा नये.

नेते असोत की अभिनेते जर त्यांनी नियमाचे उल्लंघन केले असेल तर दंड भरायलाच हवा. चूक कशीही होवो. दंड म्हणून दिलेली शिक्षा मोठ्या मनाने मान्य केली पाहिजे. ती चूक तुमच्या चालकाने केलेली असो की तुम्ही ! कारण तो चालक तुमचाच आहे. त्याची चूक ही माझीच आहे हे सांगण्याचे धाडस ज्यांची या यादीत नावे आली आहेत त्यांनी दाखवायला हवे ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com