Traders in Trouble due to GST Sharad Pawar | Sarkarnama

जीएसटीमुळे 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी व्यापाऱ्यांची अवस्था : शरद पवार

मिलिंद संगई
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

जीएसटीच्या रचनेमुळे व्यापारी वर्गात कमालीची अस्वस्थता असून अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, पंतप्रधानांनी रोजगारवाढीचे दिलेले आश्वासन पाळले जाणे तर दूरच, उलट लाखो लोकांच्या नोक-या गेल्या हे सर्वच चित्र कमालीचे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री नेते शरद पवार यांनी केले.

बारामती : जीएसटीच्या रचनेमुळे व्यापारी वर्गात कमालीची अस्वस्थता असून अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, पंतप्रधानांनी रोजगारवाढीचे दिलेले आश्वासन पाळले जाणे तर दूरच, उलट लाखो लोकांच्या नोक-या गेल्या हे सर्वच चित्र कमालीचे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री नेते शरद पवार यांनी केले.

बारामतीत दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. जवाहर वाघोलीकर यांनी शरद पवार यांचा सत्कार केला.
 या प्रसंगी जीएसटी, नोटाबंदी, रोजगारात होणारी घट, शेतीमालाचे हमीभाव यासह अनेक विषयांवर शरद पवार यांनी मोकळेपणाने मते व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले. तीन वर्षांच्या काळात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

पवार म्हणाले, ''जीएसटीची करप्रणाली जगात ज्या देशांनी स्विकारली तेथे त्यांनी समान व किमान कर रचना स्विकारली, जी आपल्याकडे झाली नाही. आज या करप्रणालीमुळे व्यापा-यात अस्वस्थता तर आहेच पण याचा थेट परिणाम ग्राहकांची क्रयशक्ती संपुष्टात येत असून रोजगारनिर्मिती ठप्प होण्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावला आहे.''

ज्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्यापारी वर्गाने तीन चार वर्षांपूर्वी बदल घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली, तोच व्यापारी वर्ग आज वास्तवतेचे भान ठेवून निर्णय होत नसल्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन ठेपल्याचे शरद पवार म्हणाले.

जीएसटीने देशात निराशेचे वातावरण तयार झाले आहे, वृत्तपत्र व्यवसायालाही त्याचा कमालीचा फटका बसला असून जाहिरातींवरही विपरीत परिणाम झाल्याचे ते म्हणाले.
छोट्या व मध्यम बांधकाम व्यावसायिकांचे तर दिवाळ निघण्याची वेळ येऊन ठेपली असून देशात कोणत्याच क्षेत्रात आज गुंतवणूकीला पोषक वातावरणच नसल्याने अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागल्याचे पवार यांनी नमूद केले. आज सूरत सारख्या शहरातील व्यापारी कधी नव्हे ते रस्त्यावर उतरले आहेत, देशातील व्यापा-यांना व्यापार करायचा की कागदपत्रे पूर्ण करण्यात वेळ घालवायचा हेच समजेनासे झाले आहे. करप्रणाली सुलभ करण्याऐवजी कमालीची क्लिष्ट केल्याने 'भीक नको पण कुत्रे आवर', अशीच व्यापा-यांसाठी जीएसटीची अवस्था झाल्याचे ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम
व्यापारी जीएसटीने धास्तावला आहे, नवीन धाडस करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही, त्या मुळे एकूणच अर्थव्यवस्थेच्या गतीवर त्याचा विपरीत परिणाम चिंताजनक असल्याचे शरद पवार म्हणाले.

संबंधित लेख