धक्कादायक प्रकार : जात पंचायतीची महिलेला पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा!

काळ बदलला, पुढे गेला तरीही अद्यापही अनेकांच्या मनातील अंधश्रध्दा आणि जात-पात व त्यातील वर्चस्वाची नशा कायम आहे. यातूनच चोपडा (जळगाव) येथील नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीने पुर्नविवाह केलेल्या महिलेला आपली थुंकी चाटण्याची शिक्षा केली आहे.
Women
Women

नाशिक : काळ बदलला, पुढे गेला तरीही अद्यापही अनेकांच्या मनातील अंधश्रध्दा आणि जात-पात व त्यातील वर्चस्वाची नशा कायम आहे. यातूनच चोपडा (जळगाव) येथील नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीने पुनर्विवाह केलेल्या महिलेला आपली थुंकी चाटण्याची शिक्षा केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र त्याबाबत खातरजमा होऊ शकली नाही. याबाबत  जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले, "ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला अंत्यत लांच्छनास्पद आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा आधार घेऊन त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे."

याबाबत मिळालेली माहिती अशी,  चोपडा (जळगाव) येथील एका महिलेने एकाशी २०११ मध्ये विवाह केला होता. मात्र पतीला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन मारहाण करत असल्याने २०१५ मध्ये तिने न्यायालयामार्फत रितसर घटस्फ़ोट घेतला. या महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फ़ोट अमान्य केला. दरम्यान पिडीत महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह देखील पंचांनी अमान्य केला. 

यासंदर्भात जात पंचायतीने महिलेला एक लाख रुपये दंडाची शिक्षा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन त्यांनी नवा न्यायनिवाडा केला. त्यावेळी दारू व मटणाचे जेवण घेतले. पिडीत परीवारास जात बहिष्कृत केले. त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परीवारांनाही बहिष्कृत करण्यात आले. पिडीत महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असा पंचांचा आग्रह होता. पुनश्च जातीत जातीत येण्यासाठी आणखी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. सगळीकडे कोरोनाचा प्रसार होत असतांना ही शिक्षा दिली हे विशेष.

त्यानंतर एव्हढ्यावर हे प्रकरण न थांबता, पंचांचे जोडे पिडीत महिलेने डोक्यावर घेऊन पंचाच्या पायावर नाक घासायचे आणि नंतर पिडीत महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे पंचांनी जाहीर केले .

पिडीत महिला पंचाच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकावले आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पिडीतेच्या कुटुंबाने धर्म बदलावा, असा हुकूम पंचांनी काढला आहे. पिडीत महिलेसोबत आई व आजी राहत आहे. सध्या ते भिक्षा मागुन उदरनिर्वाह करीत आहेत. कोरोनामुळे ते देखील बंद झाले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या मदतीला धाऊन आली. समितीचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे, दिगंबर कट्यारे, डॅा आयुब पिंजारी आणि जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंतीताई दिघे यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com