मनसेचे पुण्यात शिलेदार तीन; पण काम करणार कोण?

मनसेचे पुण्यात शिलेदार तीन; पण काम करणार कोण?

पुणे : मनसेमध्ये  पुन्हा धुगधुगी निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे सरसावले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षनेते आणि सरचिटणीस जाहीर केले.  या नव्या रचनेत पुण्यातील तीन शिलेदारांचा समावेश झाला आहे. मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला बनलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात हे तीन शिलेदार समाधानकारक कामगिरी आता बजावतील का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. 

पुण्यातील माजी आमदार दीपक पायगुडे, अनिल शिदोरेंना नेता म्हणून स्थान दिले आहे. पुणे जिल्ह्यातून बाबा जाधवरावांना सरचिटणीसपद बहाल केले आहे. आता या तिघांतील कोण पक्षाला पुणे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कार्यरत करणार हा आता कार्यकर्त्यांपुढे प्रश्न आहे. पक्षातील नव्या दमाच्या आणि धडाडीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी इतरांना कार्यकारिणीत स्थान दिल्याची कुजबुज मनसेच्या वर्तुळात आहे


दीपक पायगुडे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून अलिप्तता स्वीकारली आहे. मनसेच्या स्थापनादिनाच्या दिवशी झालेल्या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले होते. त्यामुळे ते पुन्हा संघटनेत सक्रिय होणार, अशी अपेक्षा होती. त्यानंतर त्यांचे नाव कोणत्या कार्यक्रमात किंवा आंदोलनात आढळून आले नाही. दुसरीकडे ते त्यांच्या लोकसेवा सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणीच्या कायदेशीर लढाईत अडकले आहेत. त्यामुळे ते संघटनेला कितपत वेळ देऊ शकतात, हा प्रश्न कार्यकर्तेच उपस्थित करीत आहेत.

अनिल शिदोरे हे अभ्यासक म्हणून संघटनेत कार्यरत आहेत. मनसेच्या आंदोलनाची वैचारीक पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. संघटनेचा विस्तार किंवा रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम थेटपणे करण्यावर त्यांच्या मर्यादा आहेत. त्यांचाही जनमानसात कनेक्ट आहे, अशी स्थिती नाही.

ग्रामीण नेतृत्त्व म्हणून बाबा जाधवराव यांच्याकडे आता सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या शेतकरी आघाडीचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत आहेत. जिल्ह्यात मनसेला फारसे स्थान नाही. असलेच तर ते पुरंदर आणि जुन्नरपुरते आहे. पक्षाचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पक्षाला कधीच रामराम केला आहे. ते पक्षाच्या कार्यक्रमालाही फारसे उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे पुण्यात पक्षाचे तीन शिलेदार आणि एक आमदार असला तरी पु्न्हा राज ठाकरे यांनाच पुण्यात स्वतः लक्ष घालावे लागणार आहे, अशी स्थिती आहे.   
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com