जोशी, गाडगीळ, छाजेड : पुण्यात काॅंग्रेससमोर पर्याय

जोशी, गाडगीळ, छाजेड : पुण्यात काॅंग्रेससमोर पर्याय

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दोन्ही कॉंग्रेसनी एकजूट दाखवली असून पुण्यात लोकसभेला कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी एकदिलाने लढण्याचा निर्धार दोन दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांच्या शहर पातळीवरील नेत्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याची जागा कॉंग्रेसकडेच राहणार हे गृहित धऱून या पक्षातील नेत्यांनी तशी पावले टाकावयास सुरवात केलीआहे. पक्षाचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी व माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांची नावे यात आघाडीवर आहेत. या तिघांशिवाय मधून-मधून कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा करीत असतात. अर्थात यात चव्हाण यांच्या इच्छेपेक्षाही त्यांनी पुण्यातून लढावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा अधिक आहे. 

या तिघांपैकी आमदार गाडगीळ यांनी विविध माध्यमातून लोकसंपर्क सुरू केला आहे. लोकसभेच्या उमेदवारीकरिता आपण केवळ इच्छुक नाही तर गंभीर आहोत हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोहन जोशी यांनी 1998 साली कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली होती. आपण निष्ठावान कॉंग्रेसजन आहोत, अशी त्यांची भूमिका आहे.

माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी सुमारे दहा वर्षे शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. एकेकाळचे पुणे कॉंग्रेसचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांचा छाजेड यांच्यावर प्रचंड विश्‍वास होता. मात्र आता कलमाडी कॉंग्रेसध्ये नाहीत. त्यांची सद्दी संपली आहे. त्यामुळे छाजेड यांना कितपत संधी मिळते याबाबत साशंकता आहे.

अनंतराव गाडगीळ यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली तेव्हादेखील छाजेड यांनी प्रयत्न केले. मात्र त्यावेळी त्यास यश आले नाही.गाडगीळ यांच्या आमदारकीची मुदत आणखी अडीच वर्षे आहे. मात्र त्यांनी पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाकडे मागणी करण्याआधीची मूलभूत तयारी तयारी सध्या ते करीत आहेत.

 "फेकू मोदी सरकार' या व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख दोनशे कार्यकर्त्यांशी या निमित्ताने त्यांनी संवाद सुरू केला आहे. आमदार गाडगीळ यांच्यामागे गाडगीळ घराण्याची राजकारणातील मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा काकासाहेब गाडगीळ पुण्यातून कॉंग्रेसचे दोनवेळा खासदार होते. त्याकाळच्या कॉंग्रेसधील ते ज्येष्ठ नेते होते. स्वातंत्र्य चळवळ आणि कॉंग्रेच्या कार्यात ते आघाडीवर होते. वडील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ तीनवेळा पुण्यातून खासदार झाले होते. केंद्रीय मंत्रीपद अनेक वर्षे त्यांच्याकडे होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व गांधी घराण्याशी जवळीक हे त्यांचे विशेष होते. घराण्याची ही परंपरा, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व स्वच्छ चारित्र्य हे गाडगीळ यांची जमेची बाजू आहे.

या तुलनेत अभय छाजेड व मोहन जोशी सध्या काहीसे बाजूला पडले आहेत. कॉंग्रेसच्या कार्यक्रमांध्ये ते फारसे सक्रिय होताना दिसत नाहीत. तरीही या दोघांचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेला संपर्क आणि व्यापक नेटवर्क नाकारता येण्यासारखे नाही. या तिघांशिवाय जसे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे नाव कार्यकर्ते अधून-मधून घेत असतात त्याप्रमाणे ऐनवेळी एखादे वेगळेच नाव येऊ शकते. निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. या काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. ऐनवेळी उमेदवारी कुणाला मिळेल हे सांगता येत नाही. राजकारणात सारेच अस्थिर आणि अनिश्‍चित असते.तरीही आमदार गाडगीळ यांनी सुरू केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना किमान द्यायला हवी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com