three ex meyor loss election in sangli | Sarkarnama

#SangliResult किशोर जामदार- इद्रिस नायकवडी- विवेक कांबळे 3 माजी महापौर पडले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पराभूत माजी नगरसेवक : 
माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, विजयकुमार हाबळे, संगीता सुनके, हरिदास पाटील, प्रमोद सूर्यवंशी, शीतल पाटील, उत्तम कांबळे, मंत्री सदाभाऊंचे समर्थक संभाजी मेंढे, अजित दोरकर, अनिल कुलकर्णी, किरण सूर्यवंशी; नगरसेविका पुत्र धनंजय कुंडले, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांनाही पराभवाचा धक्का बसला. 

सांगली : महापालिकेच्या कारभारावर एकहाती वचक ठेवू पाहणारे, प्रसंगी बंड करून नेत्यांची कोंडी करणारे आणि नवनवे "पॅटर्न' राबवण्यात माहीर असलेल्या तीन माजी महापौरांसह16 विद्यमान नगरसेवकांचा या महापालिका निवडणुकीत त्रिफळा उडाला. 

मिरजेचे कॉंग्रेस नेते किशोर जामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते इद्रिस नायकवडी आणि भाजपचे विवेक कांबळे या माजी महापौरांचा त्यात समावेश आहे. मिरज पॅटर्नचे शिलेदार म्हणून यांची विशेष ओळख आहे, ते आता सभागृहात दिसणार नाहीत. 

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांना धक्का बसला. त्यांचा पराभव झाल्याने निकालाचा नवा ट्रेंड समोर येत गेला. इद्रिस नायकवडी यांचा पराभव करत जामदारांची नवी पिढी अर्थात करन यांनी महापालिकेत प्रवेश केला. स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते, कॉंग्रेसचे गटनेते किशोर जामदार या दोन मातब्बरांना एकाच प्रभागातून पराभवाचा सामना करावा लागला. जामदार यांचा पराभव त्यांच्या चेल्यानेच म्हणजे गणेश माळी यांनीच केला. 

प्रभाग आठमधून लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्नेहा औंधकर यांची विकेट भाजपच्या कल्पना कोळेकर यांनी घेतली. कोळेकर आता भाजपच्या महापौर पदाच्या शर्यतीत असतील. सांगलीवाडीत माजी आमदार दिनकर पाटील यांच्या चिरंजीवाने अखेर नगरसेवक दिलीप पाटील यांची दांडी उडवली. गावभागात माजी आमदार संभाजी पवार गटाचा दारुण पराभव झाला. तेथे नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, आशा शिंदे, शिवराज बोळाज यांना पराभवाचा धक्का बसला. खणभाग म्हणजे कॉंग्रेसचा बालेकिल्ला. तेथे कॉंग्रेसच्या नगरसेविका पुष्पलता पाटील यांना घेरण्यात भाजपने यश मिळवले. 

 

संबंधित लेख