तर मग माझ्या संजय घाटगे या दोस्ताचं काय ? हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत दादांना टोला
श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार द्यायचा झाल्यास दोन्ही घाटगे गट एकत्र आले पाहीजेत असे भाजपाच्याही नेत्यांना वाटते.
म्हाकवे : "चंद्रकांतदादांची वक्तव्य बेभरवशाची असतात . ते हुपरीला जाऊन डॉ. सुजित मिणचेकर तिसऱ्यांदा आमदार होतील, अशी घोषणा करतात. इकडे ऊतूरला जाऊन समरजीत घाटगेंना आमदार करू, अशी घोषणा करतात. त्यांची ही भाषणे भाजपा- शिवसेना युती गृहीत धरून असतील तर मग माझ्या संजय घाटगे या दोस्ताचं काय ?" असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला .
अर्जूनी (ता. कागल) येथे युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज देसाई होते.
हसन मुश्रीफ यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरुद्ध जोरदार टीका केली . ते म्हणाले ," पाच वर्षापूर्वी आम्ही सत्तेत असताना रस्ते दर्जेदार होते; मात्र, भाजप-शिवसेनेच्या काळात राज्यातील रस्त्यांची दुरवस्था अवस्था झाली आहे. पाच वर्षे संपत आली तरीही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची वल्गना करण्यात दंग आहेत. देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खड्डे पाहून लाज वाटते, पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कधी वाटणार? त्यामुळे आता या सरकारला जनताच खड्ड्यात घालेल. "
यावेळी बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले,युवराज देसाई आदींची भाषणे झाली .
आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून माजी आमदार संजय घाटगे हे भाजपाचे 'कमळ' हातात घेण्याची चर्चा तालुक्यात आहे . श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार द्यायचा झाल्यास दोन्ही घाटगे गट एकत्र आले पाहीजेत असे भाजपाच्या नेत्यांना वाटते.
या भावनेतूनच 'शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले 'म्हाडा' चे अध्यक्ष पद दिले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे . त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी दोन्ही इच्छुकांत संघर्ष होऊन भाजपचे काम अवघड व्हावे यासाठी चंद्रकांतदादांना टोला लगावला असावा .