Then we will send RSS people behind the bars : Prakash Ambedkar | Sarkarnama

... तर 'आरएसएस'वाल्यांना जेलमध्ये सडवू : ऍड. प्रकाश आंबेडकर 

दत्ता देशमुख 
शनिवार, 12 जानेवारी 2019

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थिती शनिवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा झाली. शेतकऱ्यांमधून नेतृत्व उदयास यावे म्हणून बाजार समित्या, सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाण यांनी रुजविली. महत्मा गांधींपासून, बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्या यशवंतराव चव्हाणांनी सोडविल्या.  अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाचा गौरव केला . 

बीड :  "संघटना, कंपनी, संस्थेला नोंदणी आवश्यक आहे. मग, आरएसएसला का नाही.  आम्हाला वेगळा आणि आरएसएसला वेगळा कायदा का? वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर आरएसएसने नोंदणी केली नाही तर त्यांच्यावर बंदी घालून जेलमध्ये सडवू,"असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

भाजप - आरएसएसला चळवळीचा नसून केवळ हिंदू - मुस्लिम दंगलीचा इतिहास असल्याचा आरोप त्यांनी केला.   आरएसएस बाबत काँग्रेस गप्प आहे. त्यांनी भूमिका जाहीर करेपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही असेही   प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा शनिवारी बीडमध्ये झाली. यावेळी श्री. आंबेडकर बोलत होते. श्री . आंबेडकर म्हणाले, देशात विकास, हाताला काम देण अपेक्षित असताना दहा टक्के आरक्षण देवून हे सरकार फसवे असल्याच पुन्हा सिद्ध केलं आहे. नोटाबंदीतून कमावलेल्या पैशातून भाजप निवडणुकांत पाच हजार रुपयांना मत घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

. बीडच नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असल्यामुळेच येथील चार कारखाने बंद आहेत. राज्यात दुष्काळ आहे, पण चारा - पाण्याचे नियोजन नाही. सरकारमध्ये दानत नसल्याचे सांगत गोदामांत लाखो टन धान्य सडत असताना जनावरांनाही खायला दिले जात नाही. महाराष्ट्रातील १६९ कुटूंबाभोवती फिरणारी सत्ता वंचितांपर्यंत पोचविण्यासाठी आघाडी केली आहे, असेही ते म्हणाले . 

देशात गरजेपेक्षा २० टक्के साखर अधिक उत्पादीत होत असताना मोदी सरकारने पाकिस्तानातून २० लाख टन साखर आयात केली. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदार अडचणीत आले. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौकशा मागे लागतील म्हणून कोणी मोदींना विचारत नाही असेही आंबेडकर म्हणाले.

नव्वद दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे. आम्ही लोकसभेपूर्वी - विधानसभा उमेदवार आज जाहिर करू इच्छत होतो. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाली तर मारुन टाकण्याची भिती असल्याचे अनेकांनी सांगीतल्याचा गंभीर आरोप  प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख