Then Modi should Give ration , petrol & diesel free : Udhhav Thakre | Sarkarnama

तर मोदींनी रेशन, डिझेल पेट्रोलही फुकट द्यावे :  उध्दव ठाकरे 

विष्णू सोनवणे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

केबल चालक मालक संघटनेच्या वतीने आज रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. 

मुंबई  : "  डिजिटल इंडियामध्ये केबल, इंटरनेट फुकट  मिळत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन, डिझेल, पेट्रोलही फुकट द्यावे", असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

केबल चालक आणि मालकांच्या शिवसेना पाठिशी राहिल, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

रिलायन्सच्या जिओने केबलचे जाळे विस्तारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील केबल चालक आणि मालकांना व्यवसाय संकटात येण्याची भिती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर केबल चालक मालक संघटनेच्या वतीने आज रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. 

केबल फुकट देत असतील तर भांडायचे कशाला असा सवाल करीत  ते म्हणाले की," पंतप्रधान मोदी यांनी यातून काही तरी शिकावे. घराघरात केबल फुकट मिळत असेल तर रेशन, डिझेल आणि पेट्रोलही फुकट द्यावे. या सर्व गोष्टी फुकट द्यायला कोणाचीच हरकत नसावी. "

रिलायन्स डिजिटल क्षेत्रात देशभर आपले जाळे पसरविले आहे. त्याचा संदर्भ देतउद्धव ठाकरे म्हणाले की, "डिजिटल इंडिया करून लोकांची पोटं भरत नाहीत. त्याने जर पोट भरत नसेल तर डिजिटल इंडिया काय चाटायचे आहे काय?   लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी लढावे लागत आहे. केबल चालक आणि मालकांना उध्वस्त होवू देणार नाही. तुमच्या पाठिशी शिवसेना आहे, तुम्हाला बळ देण्यासाठीच मी या ठिकाणी आलोय . "

 आमदार अनिल परब यांच्याकडे त्यांनी केबल चालक मालक यांचे नेतृत्व सोपविले. राज्यभरातून केबल चालक मालकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

50 वर्षांचा करार करा 
" रिलायन्सने मुंबईसह महाराष्ट्रात जिओचे जाळे टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. केबल फुकट देण्याचे त्यांनी जाहिर केले आहे. ते आलेच तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. केबल फुकट देण्याची भाषा केलीच तर त्यांच्याशी त्याबाबत 50 वर्षांचा करार करा, तसा करार करण्यासाठी कोणीही आडकाठी करणार नाही", असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. 

 

संबंधित लेख