thane-shiv-sena-office-bearers-fiasco | Sarkarnama

शिवसेनेच्या कार्यालयात नियुक्त्यांसाठी रात्री दहाला बोलावले आणि बाराला रिक्तहस्ते घरी पाठवले

शर्मिला वाळुंज
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नव नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे, तातडीने रात्री  10 वाजता ठाणे येथील शिवसेनेच्या कार्यालयात जमा असा संदेश मिळाला. आपल्या कामाचे चीज होणार या भावनेने ग्रामीण भागातील सेनेचे सारे पदाधिकारी ठाण्याच्या आनंद दिघे कार्यालयात जमा झाले.

ठाणे :  नव नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे, तातडीने रात्री  10 वाजता ठाणे येथील शिवसेनेच्या कार्यालयात जमा असा संदेश मिळाला. आपल्या कामाचे चीज होणार या भावनेने ग्रामीण भागातील सेनेचे सारे पदाधिकारी ठाण्याच्या आनंद दिघे कार्यालयात जमा झाले. रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहील्यानंतर नियुक्ती पत्र आता नाही तर नंतर  देण्यात येईल असा निरोप आला . त्यामुळे  निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

शिवसेना पक्षाविषयी आम्हाला आपुलकी आहे, त्यामुळेच आम्ही पक्षात गेले कित्येक वर्षे निष्ठेने कार्यरत आहोत. वारंवार ग्रामीण भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार असेल तर शिवसेनेला येत्या निवडणूकीत हे महागात पडेल असा इशारा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कल्याण ग्रामीण विभागातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी वरिष्ठांच्या कार्यालयातून फोन आले. नव नियुक्तीचे पत्र देण्यात येणार असून रात्री 10 वाजता आनंद दिघे कार्यालयात जमण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामीण भागातील जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख असे साधारण 150 पदाधिकारी कार्यालयात जमले. दोन तास वाट पाहिल्यानंतर रात्री 12 वाजता नियुक्ती पत्राचे वाटप आज केले जाणार नाही असे सांगण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

 लोकसभा विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असल्याने या नियुक्त्या करण्यात येणार होत्या, परंतू त्या झाल्या नाहीत. पाच वर्षापूर्वीही निवडणूकीच्या दरम्यान अशाच नियुक्त्या करण्यात येणार होत्या. परंतू त्यावेळीही काही वरिष्ठांच्या सांगण्यावरुन पदासाठी दावेदार असूनही ही पदे पदाधिकाऱ्यांना दिली गेली नाहीत. काही गाव गुडांनी कार्यालयात धुमाकूळ घालून पद काढून घेतल्यास पक्ष सोडण्याची धमकी वरिष्ठांना दिली. 

वरिष्ठांनी आमची समजूत घातल्याने पक्षासाठी आम्ही त्यावेळी काहीही बोललो नाही. त्यानंतरही महापौर राजेंद्र देवळेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 27 गावाला महापौर पद देण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले. परंतू आश्वासन न पाळता हे पद भाजपाला दिले गेले. आत्ताही आम्हाला कार्यालयात बोलावून दोन तास बसवून कोणतेही नियुक्ती पत्र दिले गेले नाही. वारंवार होणारी ही अपमानास्पद वागणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा ग्रामीण कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

ग्रामीण भागातील कार्यकर्ते हे स्थानिक भूमिपूत्र आहेत. कोणाही वरिष्ठांच्या दबावाखाली ते काम करणार नाहीत. वरिष्ठांच्या वारंवारच्या या वागणूकीमुळे कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. भविष्यात हे पक्षाला महागात पडणार असून आमच्या कार्याची दखल घेतली गेली नाही, तर नक्कीच आगामी निवडणूकीत स्थानिक भूमिपूत्र पक्षाशी किती संलग्न रहायाचे याचा विचार करेल असे मतही कार्यकर्त्यांनी मांडले.

संबंधित लेख