thane-ravindra-chavan | Sarkarnama

`मेट्रो आम्ही आणली म्हणणारे ठाण्याचे नेते आहेत तरी कोण ?'

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कोणी कितीही बोटीवरून बसून पाहणी दौरे केले, तरी जलवाहतुकीचे संपूर्ण श्रेय हे भाजपलाच जाते, असा टोला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या टोला मारला. त्यामुळे पुन्हा युतीमधील राजकीय कलगीतुरा समोर आला आहे.

डोंबिवली : कोणी कितीही बोटीवरून बसून पाहणी दौरे केले, तरी जलवाहतुकीचे संपूर्ण श्रेय हे भाजपलाच जाते, असा टोला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या टोला मारला. त्यामुळे पुन्हा युतीमधील राजकीय कलगीतुरा समोर आला आहे.
 
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे डोंबिवली पूर्वेकडील बालभवन सभागृह येथे नुकताच "दिलखुलास संवाद' हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध नागरी आणि विकासाच्या प्रश्‍नांना चव्हाण यांनी उत्तरे दिली. 

या वेळी जलवाहतुकीबाबत आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले, की जलवाहतुकीची जनक भाजपच आहे. जलवाहतूक सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अत्यंत सकारात्मक असून त्यांनी प्राधान्याने या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला आहे. केवळ त्यांच्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीचे प्रकल्प येत्या कालावधीत पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही बोटीतून फिरले, तरी बोटीचे खरे मालक आम्हीच आहोत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एमएमआरडीएचे अध्यक्ष असल्याने त्यांनी ठाणे, नवी मुंबई, पनवेल ते कल्याणपर्यंतच्या भागात मेट्रोचे जाळे निर्माण करणारे निर्णय घेतले. एमएमआरडीएच्या प्रकल्पात आमदार, खासदार यांना ढवळाढवळ करता येत नाही. तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मेट्रो आम्ही आणली म्हणणारे ठाण्याचे नेते आहेत तरी कोण, असा टोलाही त्यांनी मित्रपक्षाला लगावला. 

दरम्यान, या कार्यक्रमास चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यादेखील उपस्थित होत्या. शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, अशी अपेक्षा त्यांनी एक डोंबिवलीकर म्हणून राज्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्याने सभागृहात एकच हशा पिकला. 

महापालिकेत राहूनच 27 गावांचा विकास शक्‍य 
महापालिकेत राहूनच 27 गावांचा विकास होऊ शकतो. आज या भागात मूलभूत सोई-सुविधांच्या काही समस्या असल्या, तरी त्या सोडवण्याला प्राधान्य दिले जात आहे. सरकारच्या मदतीने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे 27 गावांतही महापालिकेच्या माध्यमातून चांगल्या सोई-सुविधा नजीकच्या काळात मिळतील, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला. 

केडीएमसी निवडणुकीवेळी या गावांची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे, अशी भूमिका घेत भाजपने मतांचा जोगवा आपल्या पदरात पाडून घेतला होता; मात्र आता चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे भाजपचा दुटप्पीपणा समोर आला आहे.

संबंधित लेख