ठाणे-रायगडातील मनसैनिक राजवर नाराज

पक्षस्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात मुंबईपेक्षाही ठाणे-रायगडात मनसे फोफावली, कार्यकर्त्यांचे जाळे विखुरले गेले. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेत मनसेची सर्वाधिक आंदोलने ठाणे-रायगडात झालेली आहेत. परंतु, राज ठाकरेंनी ठाणे-रायगडातील पक्षसंघटना बांधणीकडे कानाडोळा केल्यामुळे या भागात मनसेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
ठाणे-रायगडातील मनसैनिक राजवर नाराज

मुंबई : मनसे 'सुप्रिमो' राज ठाकरेंच्या विरोधात ठाणे-रायगडातील मनसैनिकांचे नाराजीचे प्रमाण वाढतच चालले असून त्याचा फटका पक्ष संघटनेला बसणार आहे. ठाणे-रायगडातील पक्षबांधणीकडे राज ठाकरेंनी केलेला कानाडोळाच मनसैनिकांना सेना-भाजपाकडे जाण्याकडे प्रवृत्त करू लागला असल्याचा आरोप मनसेकडून विधानसभा लढलेल्या उमेदवारांकडून केला जाऊ लागला आहे.

पक्षस्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात मुंबईपेक्षाही ठाणे-रायगडात मनसे फोफावली, कार्यकर्त्यांचे जाळे विखुरले गेले. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेत मनसेची सर्वाधिक आंदोलने ठाणे-रायगडात झालेली आहेत. परंतु, राज ठाकरेंनी ठाणे-रायगडातील पक्षसंघटना बांधणीकडे कानाडोळा केल्यामुळे या भागात मनसेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

2009 साली नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघापैकी फक्त बेलापुर विधानसभा मनसेने लढविली. ऐरोलीत के.आर.गोपींसारखा सक्षम उमेदवार असतानाही मनसेने ऐरोली लढविली नाही. नाईकांवरिल राज ठाकरेंच्या प्रेमामुळे ऐरोलीतील मनसैनिकांचा राज ठाकरेंनी विश्‍वासघात केल्याचे बोलले जात आहे. त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीतही फक्त 60 जागा मनसेने लढविल्या. पक्षसंघटनेत मातब्बर उमेदवार असतानाही तुलनेने नगण्य उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मनसेची निवडणूकीतील उमेदवारी यादी नाईकांनीच दिली असल्याचा आरोप त्या निवडणुकीत राज ठाकरेंवर मनसैनिकांकडून करण्यात आला. त्यामुळे मनसेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी शिवसेना-राष्ट्रवादीत जावून निवडणूक लढविली.

2010 साली मनपाची पाचवी सार्वत्रिक निवडणूक मनसेने न लढविल्यामुळे काही मनसैनिकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. रायगडातही पक्षबांधणीकडे राज ठाकरेंनी सुरूवातीपासूनच कानाडोळा केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत मनसे कधीही गांभिर्याने लढली नाही. नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसेने कमी जागा लढविल्या. एकीकडे शिवसेना उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेना पक्षअध्यक्ष उध्दव ठाकरे जाहीर सभा घेतात. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे रॅली काढतात आणि दुसरीकडे राज ठाकरेंनी पनवेल महापालिका निवडणूकीत सभा घेतली नाही, तसेच रॅली घेतली नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत राज ठाकरेंनी आपल्यावर वार्‍यावर सोडले असल्याचा संताप आता पनवेलमधील मनसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबईतील मनसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे आकर्षित झाले असून पनवेलमधील मनसैनिकांचा कल भाजपा व शिवसेनेकडे झुकलेला पक्षातंर्गत घडामोडीदरम्यान दिसुन येत आहे. ठाण्यात व कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत मनसेच्या जागा घटल्या आहेत. नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीतील दोन मतदारसंघात मनसेला दहा हजार मतेही मिळविता आलेली नाहीत. एकेकाळी ठाण्यात मनसे वाढीसाठी प्रयत्न करणारे स्थानिक पातळीवरील मनसेचे नेते व पदाधिकारी आता पूर्णपणे थंडावले आहेत.
राज ठाकरेंची पक्षसंघटना वाढीबाबतची उदासिनता, निवडणूक लढविण्याबाबतची टाळाटाळ, प्रचारात सहभागी न होणे यामुळे मनसैनिक नाराज झाले असून आगामी वाटचालीसाठी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी ठाणे-रायगडातील शिवसैनिकांकडून सुरू झाल्याचे राजकीय घडामोडीं दरम्यान पहावयास मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com