Thane Municipal commissioner Sanjeev Jaiswal completes four years | Sarkarnama

चौकटीबाहेरचा आयुक्त : संजीव जैस्वाल यांचा चार वर्षाचा प्रवास

राजेश मोरे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

या शहराने प्रेम दिले आहे. ऊर्जा देणारे शहर आहे. येथील विकास कामे करताना काही समस्या येत होत्या. पण त्यावेळी अनेक सहकार्यांचे हात पुढे येत होत्‌. माझी कारकीर्दी शहराच्या दृष्टीने यशस्वी आहे की नाही, याचा निर्णय येथील जनतेने घ्यायचा आहे. पण मी शहरात काम करताना कायम चौकटीबंद विचार करण्याच्याऐवजी शहरातील भविष्यातील सुविधांचा आर्वजून विचार केला आहे. या शहरात केलेले काम हे माझ्या करिअरमधील चांगल्या कामांपैकी एक काम निश्‍चित आहे.

- संजीव जयस्वाल, महापालिका आयुक्त

ठाणे:  प्रशासकीय अधिका-यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. एक वेगळा वकुब असतो. तीन वर्षे काम करून दुस-या ठिकाणी जायचे अशी त्यांची मानसिकता असते. त्यामुळे हातातली कामेच फक्त हातावेगळी करण्याचा त्यांचा खाक्‍या असतो. अर्थात सगळेच प्रशासकीय अधिकारी अशाच धाटणीमध्ये काम करतात असे नाही. काही अपवाद असतात.

 ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हा माणूस असाच प्रशासकीय यंत्रणेमधील अपवाद आहे. प्रखर बुद्धीमत्ता, सकारात्मकता आणि आव्हाने झेलण्याचा आभाळाएवढा आत्मविश्वास आणि डोंगराएवढी कार्यक्षमता यामुळे संजीव जयस्वाल यांनी अल्पावधीतच ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर कोरलं.

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जयस्वाल हे 12 जानेवरी रोजी 4 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करीत आहेत. साचेबद्ध निर्णय घेण्याच्याऐवजी सातत्याने शहराच्या विकाससाठी आक्रमक होत असलेले अधिकारी म्हणून त्यांनी लौकीक मिळविला आहे. संजीव जयस्वाल हे प्रशासकीय चौकटीत काय कुठल्याच चौकटीत न मावणारा अपवाद म्हणायला हवा. म्हटलं तर सकारात्मक भूमिका घेवून शहरासाठी कोणतीही पर्वा न बाळगणारा प्रशासक, म्हटलं तर रूक्ष प्रशासकीय चौकटीत राहूनही आपलं संवेदनशील माणूसपण जपणारा अवलिया.

अशा अवलिया माणसामुळेच चार वर्षात रोजगार निर्मितीचे, शहराच्या सौंदर्यीकरणाचे, शहराला ऐतिहासिक चौपाटीची किनार निर्माण करण्याचे, देशात पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचे, आरोग्य सेवा सुदृढ करण्याचे, परिवहन सेवेला संजीवनी देण्याचे आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी देशात पहिला जलवाहुक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले आहे. रस्ता रूंदीकरण आणि मंजुर विकास आराख्यातील रस्त्यांची अंमलबजावणी करताना कसल्याही परिणामाची तमा न बाळगता जवळपास 80 टक्के अंमलबजावणी करणारी ठाणे महानगरपालिका देशातील पहिली महापालिका बनविण्याचे श्रेय त्यांचे आहे.

नागरिकांच्या मुलभूत सेवांना प्राधान्य देतांना नागरिकांसाठी परवडणा-या दरात डायलेसिस, सीटी स्कॅन, एमआरआय, कॉकलेहर सुविधा निर्माण करणे, कॅन्सर हॉस्पीटल प्रस्तावित करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेत्र रूग्णालय आणि संशोधन केंद्र निर्माण करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावणे अशी कामे त्यांनी केली . 

 तीन हात नाका येथे वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्प उभा करणे, कोपरी पूर्वेला सॅटीस बांधणे, तलावांचे सुशोभिकरण करणे, दिवा, खारेगाव पादचारी पूल बांधणे, कळवा ब्रीज बांधणे, उड्डाण पुलाखालील भंगार जागेचे नंदनवन बनविणे, मुलांना वाहुकीचे नियम शिकविण्यासाठी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क निर्माण करणे, ओल्या पाला-पाचोळ्यापासून जळावू इंधन बनविणे,

खारपुटीची लागवड करणे, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी स्टार्ट अप हब निर्माण करणे, शहरात जाहिरातीचे अधिकार देवून अत्याधुनिक शौचालये निर्माण करणे, न्यूयार्कच्या धर्तीवर भव्य असे सेंट्रल पार्क बांधणे, पोलिस स्थानके बांधून देणे अशा कितीतरी प्रकल्पांची आखणी करून त्यांना मुर्तरूप देण्याचे मुलभूत काम जयस्वाल यांनी प्राधान्याने केले आहे.

क्‍लस्टर योजना हा संजीव जयस्वाल यांच्या कारकीर्दीतील महत्वाचा मास्टरस्ट्रोक. अतिशय क्‍लीस्ट अशा या योजनेच्या माध्यमातून ठाणे शहराला नवे रूप परिधान करण्याचे त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. तब्बल 44 पैकी 6 नागरी पुनरूत्थान आराखड्यांना महासभा आणि उच्चाधिकार समितीनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे क्‍लस्टर योजना सर्वप्रथम राबविणारी ठाणे महानगरपालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

जवळपास 200 प्रकल्पांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी 4 वर्षांचा कालावधी अत्यंत अल्प आहे. पण प्रचंड कार्यक्षमता असलेल्या, सर्वांना सोबत घेवून जाणा-या आणि त्या कामांसाठी नागरिकांना प्रेरित करणा-या जयस्वालांच्या रक्तात अशक्‍य हा शब्दच नसावा बहुतेक.

म्हणूनच तर भर उन्हात चार चार तास पायपीट करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सतत आग्रही असणे, कार्यालय असो अथवा व्हरांडा असो नागरिकांची आपुलकीने विचारपूस करणे, मानवतेच्या दृष्टीकोनातून आहाना शर्मासारख्या गरीब विद्यार्थींनीला नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण साहाय्य करणे त्यांना सहज जमते.

म्हणूनच तर चौकटीबाहेर जावून लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी कोणत्याही थराला जावून काम करणे जयस्वालांना जमते. जे इतर कोणालाही जमणार नाही. कारण चौकट मोडण्यासाठी डोंगराएवढं धाडस असावं लागतं जे संजीव जयस्वाल यांच्यामध्ये आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख