Thane morcha MNS displays power | Sarkarnama

ठाण्यात मनसेचे शक्तिप्रदर्शन, मोर्चाला तुफान गर्दी 

राजेश मोरे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मोर्चामध्ये जिल्ह्यातील आदिवासी महिला-पुरुषही मोठ्या संख्येने दिसत होते. त्याचबरोबर तरुणांचीही संख्या लक्षणीय होती. भिवंडी, पालघरमधील परप्रांतिय कामगार, उत्तर भारतीय महिलाही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 

ठाणे :  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली राजकीय ताकद दाखविण्यास सुरुवात केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्याची तयारी गेल्या महिन्यापासून करण्यात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास मनसेचे हजारो कार्यकर्ते तीन हात नाका येथे जमा झाले होते. संभाव्य गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने मोर्चाचा वाहतुकीला विशेष फटका बसला नाही. 

मोर्चामध्ये जिल्ह्यातील आदिवासी महिला-पुरुषही मोठ्या संख्येने दिसत होते. त्याचबरोबर तरुणांचीही संख्या लक्षणीय होती. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मार्गक्रमण केल्याने मोर्चा सुरळीत पार पाडला.

"युती सरकारने केवळ नागरिकांना लुबाडण्याचे काम केले. शिवसेना आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांनी केवळ आश्‍वासनाचे गाजर देऊन जनतेची फसवणूक केली आहे", असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी केला. 

 मनसेच्या वतीने सोमवारी काढण्यात आलेल्या आंदोलनाला परप्रांतियांचे बळ मिळाल्याचे दिसले. भिवंडी, पालघरमधील परप्रांतिय कामगार, उत्तर भारतीय महिलाही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 

मोर्चामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सामावेश होता. त्यामध्ये ही शेकडोजण हे परप्रांतिय रिक्षा चालक आणि भिवंडीतील गोदामातील कामगार होते. तर, काही परप्रांतिय महिलांनीही या मोर्चात आपला सहभाग दाखवला होता. त्यामुळे एकूणच या आंदोलनाला परप्रांतियांनीही बळ दिल्याची चर्चा होती. 

 

 

संबंधित लेख