Thane Deputy mayor giving degree exam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

ठाणे उपमहापौरांची पदवी पूर्ण करण्याची जिद्द

संजीव भागवत
गुरुवार, 8 जून 2017

शिक्षणाशिवाय विकास होत नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे बोलले जाते. परंतु परिस्थितीमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण खुंटले होते. पण शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेकदा आपले शिक्षण सांगताना आपण पदवीपर्यंतचेही शिक्षण घेतले नसल्याची खंत वाटायची परंतु ते कसे घेणार, असाही प्रशन होता. परंतु यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठातून आपल्याला पदवीच्या शिक्षणाचा मार्ग सापडला- रमाकांत मढावी

महापालिकेचे कामकाज करून देताहेत परीक्षा
मुंबई  - लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारांपुढे आपल्या कामासोबतच आपल्या शिक्षणाचाही आदर्श ठेवला पाहिजे. शिक्षणच कमी असेल तर आपल्या मतदारांना शिक्षणासाठीची प्रेरणा आणि त्यासाठीचे प्रबोधन कसे करणार, असा सवाल आपल्याला कायम सतावत असल्याने पदवी पूर्ण करण्याची जिद्द ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढावी यांनी पूर्ण करण्याचा निश्‍चय केला असून त्यासाठी ते मुक्‍त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांतील परीक्षेचे पेपर देण्यात सध्या व्यग्र आहेत.

दिवसभर महापालिका आणि संबंधित काम आटोपून आपण पदवीच्या अंतिम वर्षाच्या पेपरची तयारी करूनच परीक्षेला येत असून यंदा आपल्याला बीएची पदवी चांगल्या मार्काने मिळणार असल्याचा आशावादही मढावी यांनी व्यक्‍त केला आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या मनोरमा नगर परिसरातील ज्ञानपीठ विद्यालयातील परीक्षा केंद्रावर ठाणचे उपमहापौर 2 जूनपासून मुक्‍त
विद्यापीठाच्या कला शाखेतील अंतिम वर्षांची परीक्षा देत आहेत.

पदवीच्या अंतिम वर्षात त्यांचे इतिहास आणि मराठी या दोन विषयाची परीक्षा देत आहेत. येथेच मढावी यांनी मागील दोन वर्षापासून मुक्‍त विद्यापीठाच्या कला शाखेचा अभ्यासही पूर्ण केला असल्याची माहिती या अभ्यास केंद्राच्या प्रमुख प्राध्यापिका प्रिती जाधव यांनी दिली. ठाणे जिल्ह्याचे उपमहापौर असतानाही एका सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे येऊन अभ्यासक्रम पूर्ण करत असतात.

त्यांनी मागील दोन वर्षातही आपल्या अभ्यास केंद्रात येऊन एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील तरूणांमध्ये शिक्षण घेण्याची उमेद निर्माण झाली असल्याचेही जाधव म्हणाल्या. यापूर्वी आपल्या अभ्यासकेंद्रात आजूबाजूच्या परिसरातील नोकरदार, उपेक्षित घटकातील तरूण पदवीचे शिक्षण घेत होते. आता त्यात माजी नगरसेवकांसोबत ठाणे महापालिकेच्या विद्यमान स्थायी समितीचे सदस्य असलेले राम रेपाळेही येथे पदवीची परीक्षा देत असल्याची माहिती जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

शिक्षणाशिवाय विकास होत नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे बोलले जाते. परंतु परिस्थितीमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण खुंटले होते. पण शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेकदा आपले शिक्षण सांगताना आपण पदवीपर्यंतचेही शिक्षण घेतले नसल्याची खंत वाटायची परंतु ते कसे घेणार, असाही प्रशन होता. परंतु यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठातून आपल्याला पदवीच्या शिक्षणाचा मार्ग सापडला. मागील दोन वर्षात कामकाज सांभाळतच पदवीचे दोन वर्षे पूर्ण केले असून यंदा अंतिम वर्षांची ही परीक्षा देत असून लवकरच आपण पदवीधर होणार असून त्याचा आपल्याला खूप अभिमान वाटेल अशी भावना ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढावी यांनी व्यक्‍त केली

संबंधित लेख