thakare visit for samruddhi | Sarkarnama

समृद्धी प्रकल्पग्रस्तांची उध्दव ठाकरे सोमवारी भेट घेणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जून 2017

औरंगाबाद : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन 
त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे 26 जून रोजी औरंगाबादेत येणार आहेत.

औरंगाबाद : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन 
त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे 26 जून रोजी औरंगाबादेत येणार आहेत.

औरंगाबाद, वैजापूर व गंगापूर तालुक्‍यातील 
शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत. "कितीही किंमत दिली तरी आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत' असा पावित्रा घेत शेतकऱ्यांनी 
महामार्गाला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने देखील आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वेळोवेळी जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

नागपूर-मुंबई या नव्या प्रस्तावित समृध्दी महामार्गात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन बाधीत होत आहे. शेतकऱ्यांचा जमीन देण्यास कडाडून विरोध असतांना सरकारने पोलीसी बळाचा वापर करून जबरदस्तीने जमीनीची मोजणी सुरु केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

महिनाभरापुर्वी शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकी निमित्ताने उध्दव ठाकरे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी समृध्दी महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्यमंडळाने त्यांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला होता. "तुम्ही ठाम राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राह'ू असा शब्द उध्दव ठाकरे यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना दिला होता. 

त्यानूसार सोमवार (ता.26) जून रोजी उध्दव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी दहा वाजता माळीवाडा व दुपारी बारा वाजता औरंगाबाद तालुक्‍यातील पळशी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत. तत्पुर्वी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (ता. 22) पळशी गावात जाऊन समृध्दी महामार्ग संघर्ष समितीचे नाना पळसकर व इतर शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. 
कर्जमुक्तीनंतर समृध्दीकडे मोर्चा 
कर्जमाफी, शेतमालाल हमीभाव व तूरीच्या प्रश्‍नावरून राज्यातील शेतकरी संपावर गेला होता. शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी या संपाला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवल्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या सगळ्यात समृध्दीच्या विषयाकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दहा जिल्ह्यातील समृध्दी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भव्य परिषद औरंगाबादेत घेतली. आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे सांगून पवारांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व सरकारमध्ये सुसंवाद साधण्याची भूमिका घेऊ असे जाहीर केले होते. शिवसेना दुट्टपी आहे, त्यांचा विरोध वरवरचा आहे अशी टीका या परिषदेत शेतकऱ्यांनी केली होती.

त्यामुळे समृध्दी महामार्गाचा मुद्दा राष्ट्रवादीने हायजॅक केल्याची चर्चा परिषदेनंतर राज्यभरात सुरु झाली. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी व शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या समृध्दीच्या मार्गात राष्ट्रवादीचा खोडा नको म्हणून शिवसेना देखील लढ्यात उतरल्याचे दिसते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधानंतर तरी सरकार नरमते का? हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

संबंधित लेख