thakare on samrudhi mahamarg | Sarkarnama

कुणाचे थडगे बांधून समृध्दी नको - उध्दव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 जून 2017

समृध्दी महामार्गात संपुर्ण अडीच एकर सुपीक जमीन जाणाऱ्या उत्तम पल्लाळ या शेतकऱ्याला रडू कोसळले. उध्दव ठाकरे यांनी त्याला धीर देत बोलते केले, तेव्हा दोन वर्षापुर्वी बागायती असलेली आमची जमीन महसुल विभागाने जिरायती दाखवल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. तसेच धनदांडग्यांची इंग्रजी शाळा वाचवण्यासाठी हा रस्ता वळवून आमच्या शेतातून घातल्याचे सांगितले. 
 

औरंगाबाद : "समृध्दी कुणाला नको आहे, ती तर झालीच पाहिजे. पण माझ्या शेतकऱ्यांचे थडगे बांधून ती होणार असेल तर चालणार नाही. काय तो निर्णय एकदाच 
घ्या, तुमची एकजूट कायम ठेवा, बाकीच काय करायचं ते मी बघतो" अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी समृध्दी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता रडायचं नाही, खचून जायचं नाही, मिळालेल्या कर्जमुक्तीचा आनंद घ्या, शेतातील कामे करा, तुमच्या मध्ये येणाऱ्याचे काय करायचे हे शिवसेना पाहून घेईल असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला. 

समृध्दी महामार्गात सुपीक जमीन जाणाऱ्या औरंगाबाद तालुक्‍यातील पळशी व माळीवाडा येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याशी सोमवारी (ता. 26) संवाद साधला. शिवसेना विकासाच्या विरोधात नाही, तसे असते तर मुंबई-पुणे रस्ता, 55 उड्डाणपुल, वरळी सिलिंक झालाच नसता. शेतकऱ्यांच्या घरा दारावर वरवंटा फिरवून समृध्दीच्या विकासाचे स्वप्न जर कुणी पाहत असेल तर असे भाकड स्वप्न शिवसेना कदापी पूर्ण होऊ देणार नाही.

सरकारी बाबूंनी कागदावर ओढलेल्या समृध्दीच्या रेषा शेतकऱ्यांचे जीवन संपवणाऱ्या ठरत असतील तर ते कसे सहन करणार, त्यामुळे अशा रेघोट्यांचा विकास आम्हाला नको. शेतकऱ्यांचा आशीर्वादाशिवाय तुमची समृध्दी होणार नाही असे ठणकावत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिली. 

चाळीस लाख शेतकरी मोजून घेणार 
शेतकरी व शिवसेनेच्या एकजुटीतून कर्जमाफीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. त्यामुळे शिवसेनेला श्रेय लाटण्यासाठी होर्डींग्ज लावायची गरज पडली नाही. तुम्हाला हे का सागावे लागते अशी टीका करतानाच केवळ आकडेवारी तोंडावर फेकून चालणार नाही, तर तुम्ही दावा केल्याप्रमाणे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का नाही हे मी पाहणार आहे. तुमच्याकडे आकडेवारी आहे ना, मग चाळीस लाख शेतकरी मोजून घेणारच असे ठणकावून सांगतानाच विधानसभेत देखील शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागावी अशा सूचना उध्दव ठाकरे यांनी केल्या.

मोबाईलचे बील भरायला पैसे आहेत, पण वीजबील भरायला नाही, रडतात साले, आणि कर्जमाफीची मागणी आता फॅशन बनली आहे अशा मानसिकतेच्या लोकांना आपण झुकायला लावंल, तेव्हा आता खरंच माझा शेतकरी कर्जमुक्त झालाय का हे पाहायला आलोय असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
कर्जमुक्तीच्या याद्या बॅंकेबाहेर लावा 
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कर्ज वसुल करण्यासाठी त्यांच्या घरासमोर जावून ढोल वाजवले गेले, त्याला अपमानित केल. आता त्याला कर्जमुक्ती दिली ना, मग बॅकेबाहेर ढोल वाजवूनच त्यांच्या याद्या देखील लावा. कितीजणांचा सातबारा कोरा झाला हे कळलं पाहिजे. आम्हालाही आता तुमची पारदर्शकता पहायची आहे अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या पारदर्शकतेची खिल्ली उडवली

. पंतप्रधान मोदी सांगतात देशभरातील 2 कोटी लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. कुठून आला हा आकडा. मुंबईत विचारल तिथेही कुणी सबसिडी नाकारल्याचे सांगितले नाही, तुमच्याकडेही कोणी सांगत नाही, मग हे 2 कोटीजण लपले कुठे? तसेच कर्जमाफी झालेले चाळीस लाख शेतकरी लपले तर? असा उपरोधिक सवाल देखील उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

मध्यवधीची नाही, शेतकऱ्यांची चिंता 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना दहा-बारा वर्षापासून राज्यभरात आंदोलन करतेय. कर्जमाफीच्या निर्णयाने मी समाधानी नाही म्हणणारे शरद 
पवार तेव्हा केंद्रात कृषीमंत्री होते. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाही. शेतात पेरणी करणाऱ्या हातांनी जेव्हा हातात दगड, आसूड घेतला, एकजूट दाखवली, संप करत रस्त्यावर उतरला तेव्हा कर्जमाफी झाली.

शिवसेना व माझा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. अशावेळी मध्यावधी कधी होणार? असा प्रश्‍न विचारला जातो. माझ्या दृष्टीने ते महत्वाचे नाही, मध्यवधी केव्हाही होऊ द्या, त्याहीपेक्षा मध्येच जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांची मला अधिक चिंता आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले. 
बागायतीची जिरायती झाली 
माळीवाडा येथील सुर्यभान, उत्तम व अभिजीत पल्लाळ या समृध्दी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उध्दव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण व पालकमंत्री रामदास कदम, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाट यांची उपस्थिती होती. आपली कैफियत मांडताना समृध्दी महामार्गात संपुर्ण अडीच एकर सुपीक जमीन जाणाऱ्या उत्तम पल्लाळ या शेतकऱ्याला रडू कोसळले.

उध्दव ठाकरे यांनी त्याला धीर देत बोलते केले, तेव्हा दोन वर्षापुर्वी बागायती असलेली आमची जमीन महसुल विभागाने जिरायती दाखवल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. तसेच धनदांडग्यांची इंग्रजी शाळा वाचवण्यासाठी हा रस्ता वळवून आमच्या शेतातून घातल्याचे सांगितले. 
 

संबंधित लेख