thakare and election | Sarkarnama

घोटाळे करून राष्ट्र देशोधडीला लावण्याचे पाप कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसने केले : उध्दव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

सभा सुरु होण्याच्या आधीच जोरदार वादळ वारे सुरु झाले होते. यावेळी सुरुवातीसच उध्दव ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्रभर वादळ घेवून फिरत आहे. सोबत कोणी असो की नसो हे वादळ माझ्या सोबत फिरत आहे. हेच भगव्याचे वादळ लोकसभेतही पोहचून दिल्लीचे तक्‍ख्त काबीज करणार आहे. ते म्हणाले

परभणी : घोटाळ्यावर घोटाळे करून राष्ट्र देशोधडीला लावण्याचे पाप या कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसने केले आहे. 56 पक्ष एकत्र आले काय आणि तुमच्या 56 पिढ्या जरी लढल्या तरी परभणीवरचा हा भगवा कधीही खाली उतरणार नाही असा दावा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी (ता.15) केला. परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेना - भाजप - रासप - शिवसंग्राम, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा सोमवारी येथील स्टेडीयम मैदानावर झाली. व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, शिल्पा सरपोतदार, उमेदवार खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार मोहन फड, डॉ. हिकमत उढाण, ए.जे. बोराडे पाटील. ऍड. विजय गव्हाणे, मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे आदींची उपस्थिती होती. 

सभा सुरु होण्याच्या आधीच जोरदार वादळ वारे सुरु झाले होते. यावेळी सुरुवातीसच उध्दव ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्रभर वादळ घेवून फिरत आहे. सोबत कोणी असो की नसो हे वादळ माझ्या सोबत फिरत आहे. हेच भगव्याचे वादळ लोकसभेतही पोहचून दिल्लीचे तक्‍ख्त काबीज करणार आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढले. त्याचा देखील ठाकरे यांनी खरपुस समाचार घेतला. ते म्हणाले, हा मर्दाचा हिंदूस्थान आहे. ही इटली नाही. जो या देशातील क्रांतिकारकांचा अपमान करेल. त्याच्या स्वप्नाचा चुराडा केल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाही. देशात मोदीचा लाट पाहून शरद पवारांनी पळ काढला. आता त्यांचे खासदार दिल्लीला जावून काय दिवे लावणार ते ही पळपुटे असणार अशी टिका ही त्यांनी यावेळी केली. परभणी जिल्ह्यात खासदार संजय जाधव यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला - मुलीचे विवाह लावून मोठे समाज हिताचे काम केले आहे. त्यामुळे यावेळीही प्रचंड मताधिक्‍यानी जाधव यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

वादळ वाऱ्यात सभा जोरदार 
सभा सुरु होण्याआधीपासूनच जोरदार वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. या वादळ वाऱ्यातही सभेस जोरदार गर्दी उसळली होती. वादळ वाऱ्याने सभास्थळी उभारण्यात आलेले काही बॅनर हवेने उडत असल्याने त्याला शिवसैनिकांनी पकडून ठेवले होते. व्यासपीठावरील बॅनरही हालत असल्याने त्यालाही शिवसैनिकांनी पकडून ठेवले होते. 

संबंधित लेख