thakare and aurangabad | Sarkarnama

उध्दव ठाकरेंच्या दौऱ्याची महापौरांनी घेतली धास्ती

जगदीश पानसरे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : आठ महिन्यांपूर्वी शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही. एका महिन्यात शहर कचरामुक्त करतो हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सात महिन्यांपुर्वी दिलेला शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांना अद्याप खरा करून दाखवता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता.23) होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची महापौरांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. 

औरंगाबाद : आठ महिन्यांपूर्वी शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही. एका महिन्यात शहर कचरामुक्त करतो हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सात महिन्यांपुर्वी दिलेला शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांना अद्याप खरा करून दाखवता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता.23) होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची महापौरांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. 

बुथ कमिटी सदस्य आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यासाठी उध्दव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. 16 फेब्रुवारी पासून निर्माण झालेली कचराकोंडी कधी फोडणार असा थेट सवाल उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीपुर्वी महापौर आणि महापालिका प्रशासनाला केला होता. कचराकोंडीमुळे शहरवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल उध्दव ठाकरे यांनी थेट जनतेची जाहीर माफी देखील मागितली होती. 

महिनाभरात शहर कचरामुक्त करण्याचा शब्द तो देखील थेट पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना दिल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वच्छता मोहिम जोरदारपणे राबवली. पण त्यांचा हा उत्साह उदासीन प्रशासन आणि पक्षांतर्गत, विरोधकांकडून होणाऱ्या राजकारणामुळे मावळला. परिणामी आठ महिन्यानंतरही शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न पुर्णपणे सुटलेला नाही. ओल्या कचऱ्याचे नियोजन करण्यात महापालिकेला बऱ्यापैकी यश आले असले तरी एक हजार टनाहून अधिक सुका कचरा शहराच्या विविध भागात आजही पडून आहे. 

कचऱ्यावर बोलू नका, नगरसेवकांना तंबी 
उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दिवशी कचऱ्याविषयीच्या बातम्या येऊ नये याची खबरदारी शिवसेनेच्या नेत्यांकडून घेतली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत कचऱ्याच्या विषयावर गप्प बसा असे फोनवरून सदस्यांना आदेशच देण्यात आल्याचे बोलले जाते. 

कचऱ्याच्या प्रश्‍नावरून पक्षप्रमुखांकडून "कचरा' होऊ नये यासाठी महापौर नंदकुमार घोडेले कामाला लागले आहेत. उद्या शहराच्या कुठल्याच कोपऱ्यात कचरा साचलेला दिसणार नाही याची खबरदारी घ्या, माणसे वाढवा, पण कचऱ्याची तक्रार येता कामा नये असा दम त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरला आहे. 

काय आहे परिस्थिती.. 
औरंगाबाद शहरात दररोज साधारणतः साडेचारशे टन कचरा निर्माण होतो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने 27 यंत्रांची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी केवळ तीन यंत्र चिकलठाण्यात बसवण्यात आले आहे. त्यातून रोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या शिवाय घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने 211 कोटींचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. सात वर्ष कचऱ्याचे संकलन आणि वाहतुकीचा करार या कंपनीशी करण्यात आला आहे. 
 

संबंधित लेख