tension between dysp gurav and mla mushriff | Sarkarnama

कोल्हापूरचे DySP सुरज गुरव यांनी आमदारांना सांगितलं घरी जायचं! 

​सदानंद पाटील 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

तुम्हाला आयकार्ड पाहण्याचा अधिकार कोणी दिला?

कोल्हापूर : ''साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर यायचं नाही. गडचिरोलीच काय घरी जाईन, मी घाबरत नाही. आता तुम्ही निघायचं,'' अशा सणसणीत शब्दांत डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांना सुनावले. 

कोल्हापूर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. निवडणुकीपूर्वीच या निवडीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी शक्‍यता दोन्ही बाजुंनी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या मुख्य प्रवेशदवारावरच पोलीस अधिक्षक सुरज गुरव थांबून होते. येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आयकार्ड बघून ते आत सोडत होते.

दरम्यान कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांना घेवून आमदार हसन मुश्रीफ महापालिका गेटवर आले. यावेळी गुरव यांनी नगरसेवकांना आयकार्ड दाखवण्याची सुचना केली. 

आयकार्ड पाहण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, तुम्हाला आयकार्ड पाहण्याचा अधिकार कोणी दिला, अशी विचारणा आमदार मुश्रीफ यांनी डीवायएसी गुरव यांना केली.

आपणाकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. आपण ते काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आमदार मुश्रीफ चांगलेच भडकले. त्यातून त्यांची गुरव यांच्याशी जोरदार वादावादी झाली. यावेळी आमदार मुश्रीफ यांनी गुरव यांना गडचिरोली दाखवण्याचा इशारा दिला. त्यामुळे गुरव ही चांगलेच भडकले. साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. गडचिरोलीच काय, घरीही जाईन, पण वर्दीवर यायचं नाही. आता तुम्ही निघायचं, अशा शब्दात त्यांनी आमदारांना सुनावले. त्यामुळे महापालिकेबाहेरचे वातावरण चांगलेच तापले. डीवायएसपी गुरव यांना पोलीस अधिकारी शांत करत होते. मात्र गुरव हे वारंवार मुश्रीफांकडे धावत होते. 

संबंधित लेख