तहसीलदार भोसलेंचा असाही फंडा : चार गाडी मालकांवर त्यांच्याच गाड्या चोरल्याचे गुन्हे

तहसीलदार भोसलेंचा असाही फंडा : चार गाडी मालकांवर त्यांच्याच गाड्या चोरल्याचे गुन्हे

शिक्रापूर : शिरुरचे तहसीलदार रणजित भोसले आणि त्यांच्या अजब स्टाईलमुळे होणारी चर्चा काय थांबायला तयार नाही. कारण तीन महिन्यांपूर्वी एका महिलेला धमकी, मागील महिन्यात त्यांच्या गाडीचा वाळू माफियांकडून पाठलाग अशी प्रकरणे ताजी असतानाच त्यांच्या फिर्यादीवरुन आज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये चार जप्त केलेल्या वाळू गाड्या चोरीची तक्रार दाखल झाली अाहे. विशेष म्हणजे यातील आरोपी हे याच गाडीचे मालक असल्याचेही फिर्यादीत लिहीले गेल्याने या चारही जणांवर स्वत:चीच गाडी पळविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बेकायदा वाळू वाहतूक करताना पकडलेल्या व जप्त केलेल्या चार गाड्या त्यांच्या मालकांनीच पळविल्याचा अजब गुन्हा शिक्रापूर (ता.शिरूर) पोलिस स्टेशनमध्ये आज दाखल झाला. चारही वाहने तहसिलदारांच्या खोट्या सह्या असलेली बोगस परवानगी पत्र दाखवून पळविल्याचा दावा व तक्रार  भोसले यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


 याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी. बेकायदा वाळू उपसा व वाहतूकीसंदर्भात चार ट्रक (एमएच १६-एई-५७६६, एमएच १२ एचडी ८८०९, एमएच १६ -एई- ६०७२ व एम एच १२-एचडी ७६४१) अनुक्रमे शरद दादाभाऊ मापारी (पूर्ण पत्ता माहिती नाही), सचिन शामराव झेंडे (रा.हुडको कॉलनी, शिरुर), विनायक जगन्नाथ पाचार्णे (रा.शिरूर) व बबन रामदास घालमे (पत्ता माहिती नाही) यांच्या मालकीचे गेल्या काही महिन्यांमधील बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीबद्दल  भोसले यांच्या कारवायांमध्ये जप्त करुन ते तळेगाव-ढमढेरे येथील शासकीय धान्य गोदामात जमा करुन ठेवली होती.

भोसले हे तीन दिवसांपूर्वी (दि.९) या गोदामात इतर कामाचे निमित्ताने आले असता तिथे वरील चारही वाहने दिसून आली नसल्याने त्यांनी गोदामपाल डाळींबकर यांचेकडे चौकशी केली.  यावर डाळींबकर यांनी वाहने सोडण्याची आपल्याकडे जमा झालेली पत्रे दाखविली असता सदर चारही पत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

या पत्रात जावक क्रमांक नाही, तहसीलदार यांची सही खोटी होती आणि प्रांताधिका-यांच्या पत्राचाही चुकीचा क्रमांक असल्याचे श्री भोसले यांना आढळल्याने वरील चारही वाहनांच्या मालकांविरोधात त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली.

सदर तक्रारीवरुन गाडी चोरणे, शासनाची फसवणूक करणे, खोट्या सह्या व बोगस पत्रे तयार करुन त्याद्वारे गाड्या पळवून नेणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.   

दरम्यान भोसले यांची कामाची स्टाईल धडाकेबाज असल्याने त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाया हा चर्चेचाच विषय असतो. त्यातच त्यांनी आपला अवमान केला म्हणून तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार केली आणि ही तक्रार थेट आपले सरकार पोर्टलवर झळकली. नंतर मागील महिन्यात भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करणा-या एका पारनेरमधील गाडीची तक्रार केल्यावरुन गाडीचालक व त्याचा एक सहकारी या दोघांवर प्रतिबंधात्म कारवाई शिक्रापूर पोलिसांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com