tasagon ncp morcha | Sarkarnama

"आर. आर. आबा असते तर सरकारला सळो की पळो करुन सोडले असते' ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांनी आर. आर. पाटील शेतकऱ्यांना पाणी देणारे नेतृत्व होते आणि सध्याचे नेतृत्व हे शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पाडणारे नेतृत्व आहे. जि. प., ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पाणी सोडले जात होते, आताही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील तेव्हा पाणी सोडले जाईल. अशी क्रूर चेष्टा या मंडळींनी लावली असल्याचेही त्या म्हणाल्या. 

तासगाव (सांगली): तासगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देण्याऐवजी शासन दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, तालुक्‍यातील शेती पाणी योजना सुरू करण्यासह दुष्काळ जाहीर न केल्यास उपोषणाचा इशारा आमदार सुमन पाटील यांनी दिला. भीषण संकटात राज्यकर्ते निवांत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, शेती पाणी योजना आणि प्रादेशिक पाणी योजना सुरू कराव्यात, जनावरांसाठी चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू कराव्यात, खरिपांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शक्‍तिप्रदर्शन केले. मोर्चात महिला, शेतकरी आणि युवक सहभागी झाले. मार्केटयार्डातून सुरू झालेल्या मोर्चाचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. मोर्चातर्फे निवेदन दिले. 

आमदार पाटील म्हणाल्या, गेली दोन महिने मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिली, विनंत्या केल्या, मात्र आश्‍वासनाशिवाय काही मिळाले नाही. पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार आहे. आर. आर. आबा असते तर सरकारला सळो की पळो करुन सोडले असते, असेही त्या म्हणाल्या. 

अविनाशकाका पाटील यांनी निवेदने देऊन ऐकणारे सरकार नाही यांना आंदोलनाचा रट्टा देण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन केले. शंकरदादा पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन मागण्या मान्य झाल्याशिवाय थांबवायचे नाही असे वक्‍तव्य केले. यावेळी डॉ. वि. स. महाजन, ऍड. गजानन खुजट, युवक राष्ट्रवादीचे ताजुद्दीन तांबोळी, खंडू पवार, राजेश पाटील, दिनकरदादा पाटील, संजय पाटील, प्रा. एम. बी. पवार, ऍड. गजानन खुजट, रामभाऊ थोरात, पुष्पाताई पाटील, सभापती सुरेखा कोळेकर, जोतिराम जाधव, अर्जुन थोरात यांची भाषणे झाली. जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश पाटील, किशोर उनउने, ऍड. संजय सावंत, ऍड. तुकाराम कुंभार, अमोल शिंदे, नगरसेवक बाळासाहेब सावंत, सुभाष धनवडे, कमलेश तांबवेकर, स्वप्नील जाधव, कवठेमहांकाळ नगराध्यक्षा साधना कांबळे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख