tanwani shivsena bjp | Sarkarnama

जैस्वाल-तनवाणी आजचे मित्र उद्याचे प्रतिस्पर्धी ठरणार ?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

तनवाणी यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश करत मध्यची उमेदवारी देखील मिळवली. पण दोघांच्याही नशीबी यशाचा गुलाल नव्हता. हिंदू मतांमध्ये विभाजन झालेले असतांना प्रथमच विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या एमआयएमने एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर बाजी मारली. इम्तियाज जलील वीस हजार मतांनी विजयी झाले. भाजपमुळे शिवसेनेचा उमेदवार पडला असा आरोप झाल्यामुळे तनवाणी त्यावेळी खलनायक ठरले होते. 

औरंगाबाद : महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरतांना एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे भाजप-शिवसेनेचे स्थानिक नेते गळ्यात गळे घालतांना दिसले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल तसे पुर्वाश्रमीचे शिवसैनिकच, पण आजघडीला ते भाजपमधील वजनदार नेते आहेत. नंदकुमार घोडेले, विजय औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सेना-भाजपच्या नेत्यांनी उपमहापौरांच्या दालनात थोडी उसंत घेतली. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आणि आता भाजपचे किशनचंद तनवाणी शेजारी शेजारीच बसले. या दोघांमध्ये हास्य विनोद आणि चर्चाही रंगली. हे चित्र पाहून अनेकांना हायसे वाटले पण आजचे हे मित्र उद्याचे प्रतिस्पर्धी असणार आहेत याची जाणीव देखील उपस्थितांना झाली. 

प्रदीप जैस्वाल आणि तनवाणी यांच्यातील मैत्री औरंगाबादच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरावा इतकी घनिष्ठ होती. तनवाणी पक्के व्यापारी तर प्रदीप जैस्वाल व्यापारी आणि राजकारणात असूनही सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे. शिवसेनेने या दोघांनाही भरभरून दिले. प्रदीप जैस्वाल यांना शहराचा सर्वात तरूण महापौर आणि खासदार केले. तनवाणींचा प्रवास शहरप्रमुख, महापौर आणि औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे आमदार असा होता. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही तसाच प्रकार तनवाणी-जैस्वाल यांच्या बाबतीत घडला. 

विधानसभेसाठी 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांची उमेदवारी थेट मातोश्रीवरून निश्‍चित झाली. जैस्वाल मुंबईहून औरंगाबादेत पोहचेपर्यंत त्यांच्या ऐवजी विकास जैन यांना उमेदवारी आणि बी फॉर्म देण्यात आला. प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर आक्रोश करत जैस्वाल यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची गळ घातली. शिवसेनेच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असा कधीही विचार न करणाऱ्या जैस्वाल यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याची घोषणा करत उमेदवारी दाखल केली. शिवसेनेतील मोठा गट जैस्वाल यांच्यावर अन्याय झाला या भावनेतून झपाटून कामाला लागला होता. अपक्ष असल्यामुळे दलित आणि मुस्लिम समाजात असलेले जैस्वाल यांचे मित्रही मदतीला धावून आले. जैस्वाल यांनी मोठी जोखीम पत्करली होती. पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार होती. लोकांनी त्यांना भरभरून मतदान केले आणि जैस्वाल या अग्निदिव्यातून सहीसलामत बाहेर आले. पण शिवसेनेचा आमदार आणि अपक्ष यामधील फरक त्यांना जाणवायला लागला. नारळीबागेतल्या कार्यालयातील गजबज आणि कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली होती. जैस्वाल यांचेही मन शिवसेना सोडून रमत नव्हते. शेवटी पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते स्वगृही परतले ते 2014 मध्ये उमेदवारीचे आश्‍वासन घेऊनच. 

मैत्रीला तडा 
शिवसेनेत असतांना तनवाणी आणि जैस्वाल यांच्यात मैत्रीशिवाय व्यावसायिक संबंध देखील होते. 2009 मध्ये पक्षातून बाहेर पडल्यामुळे जैस्वालांची जागा तनवाणी यांनी घेतली होती. 2014 मध्ये मध्य मतदारसंघातून पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. परंतु जैस्वाल यांच्या घरवापसीने तनवाणी यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. शिवसेनेकडून जैस्वाल यांनाच उमेदवारी मिळणार यांचा अंदाज यायला चाणाक्ष तनवाणी यांना फार वेळ लागला नाही. त्यातच 25 वर्षांची शिवसेना-भाजप युती ऐन निवडणुकीच्या तोडांवर तुटली. भाजप उमेदवारांची शोधाशोध करत असतांनाच तनवाणी यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश करत मध्यची उमेदवारी देखील मिळवली. पण दोघांच्याही नशीबी यशाचा गुलाल नव्हता. हिंदू मतांमध्ये विभाजन झालेले असतांना प्रथमच विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या एमआयएमने एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर बाजी मारली. इम्तियाज जलील वीस हजार मतांनी विजयी झाले. भाजपमुळे शिवसेनेचा उमेदवार पडला असा आरोप झाल्यामुळे तनवाणी त्यावेळी खलनायक ठरले होते. 

विजयाचा टिळा की पराभवाची पुनरावृत्ती 
विधानसभेसाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची जोरदार तयारी दोन्ही बाजूने सुरु झाली आहे. गेल्यावेळी वीस हजार मतांच्या फरकाने झालेल्या पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी जैस्वाल-तनवाणी कामाला लागले आहेत. भाजपमध्ये तनवाणी यांना स्पर्धा नसली तरी जैस्वाल यांना उमेदवारी मिळवतांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी देखील मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मातोश्रीवर शक्ती पणाला लावली आहे. मतदारसंघामध्ये विविध उपक्रम घेत त्यांनी आपली दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे जैस्वाल की दानवे याचा निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे. तुर्तास जैस्वाल-तनवाणी हे जुने मित्र उद्याच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकण्याची दाट शक्‍यता आहे. 
 

संबंधित लेख