निती आयोगाच्या बैठकीत विदर्भकन्येचे कौतुक 

राजकारणात आलंच पाहिजेकोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना आणि साधारण आर्थिक परिस्थिती असताना माझ्यासारख्या मुलीला तनिष्काने राजकारणाची वाट मोकळी करुन दिली. ऍग्रोवनच्या माध्यमातून एक हजार सरपंचांचे प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी देऊन राज्यभर माझी स्वतंत्र ओळख करुन दिली. तनिष्कामुळेच निती आयोगात महाराष्ट्रातील तीन सरपंचांमध्ये माझा समावेश होऊ शकला. वडील नसताना आईने या क्षेत्रात येण्याची हिंमत मला दिली. ही हिंमत आणि तनिष्काची साथ यामुळे समाजात परिवर्तन करु शकले. आरक्षण आहे म्हणून महिलांनी राजकारणात आले पाहिजे, असे न मानता अंगी पात्रता आहे म्हणुन आले पाहिजे, हा विश्‍वास महिलांनी बाळगावा.- योगीता गायकवाडसरपंच आणि तनिष्का गटप्रमुख,शितलवाडी, ता. रामटेक, जि. नागपुर.
yogita-tanishka
yogita-tanishka

नागपूर  :  जिल्ह्याच्या रामटेक तालुक्‍यातील शितलवाडी या छोट्याशा गावातील मुलगी तनिष्का व्यासपीठात चार वर्षांपूर्वी सहभागी झाली. वर्षभर विविध उपक्रम राबविताना स्वतःमधील नेतृत्वगुण विकसीत करीत वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी सरपंच बनली. गावाचे प्रतिनिधीत्व करताना दिल्ली येथील निती आयोगाच्या बैठकीत तिच्या सूचनांचे चक्क स्वागत झाले. कमी वयात नेतृत्त्वगुण विकसित करणाऱ्या योगिताने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. 

या बैठकीला महाराष्ट्रातुन तीन सरपंचांना बोलावण्यात आले होते. त्यात विदर्भातुन योगीता एकटीच आणि सर्वात कमी वयाची सरपंच होती. सरपंचाना मानधन , पंचायत समिती स्तरावरील एक अभियंता 45 ते 50 गावांमध्ये लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे मानधनावर तांत्रिक मनुष्यबळ वाढविणे, सरपंचाची निवड थेट जनतेतुन करावी, शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात योजना राबवाव्या, अशी भूमिका मांडली. याबाबत या विदर्भकन्येचे दिल्लीत कौतुक झाले. 

योगिताने महिलांसाठी पहिली वक्तृत्व स्पर्धा रामटेकमध्ये घेतली. महिलांचा आत्मविश्‍वास वाढला. महाविद्यालयीन तरुणींनाही तनिष्काच्या प्रवाहात आणले. योगीताचा गट दरवर्षी आठ ते 10 कौटुंबिक समस्या सोडवितात. याशिवाय तालुक्‍यात रस्ते, विज, पाणी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य नियमीतपणे केले जाते. 

किरण जयस्वाल, छाया वंजारी, पंचशीला खोब्रागडे, नंदिता मस्के, बबीता रहाटे, माला सरोते, लक्ष्मी खोब्रागडे, अरुण मेश्राम, वंदना गायकवाड, अनिता नंदनवार, अंजिरा वरकडे, सुलोचना धुर्वे, दुर्गा लोंढे, रामेश्‍वरी लोंढे, शुभा थुलकर, विजया ठाकरे, रश्‍मी काठीकर, लता क्षीरसागर, मिना चावरे या तनिष्का सदस्या योगिताच्या बरोबरीने काम करतात. 

शितलवाडीत तिच्या पुढाकाराने मेस सुरू करुन सुरूवातीला 25 ते 30 महिलांना रोजगार देण्यात येईल. पुढील महिन्यात ही मेस सुरू होणार आहे. सर्व व्यवस्था तनिष्का गट सांभाळणार आहे. याशिवाय व्यवसाय प्रशिक्षण वर्ग घेऊन महिलांना लहान-मोठे व्यवसाय सुरू करुन देण्यात येणार आहेत.

 याशिवाय योगिताने अजून एक उल्लेखनीय काम केले. 14 गावांसाठी असलेली नगरधन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद पडली होती. दर वर्षी दोन महिने सुरू आणि 10 महिने बंद अशी अवस्था होती. ग्रामपंचायत आणि तनिष्कांच्या साथीने लढा देऊन ही योजना सुरू केली. यासाठी शिखर समिती स्थापन करण्यात आली. तहसीलदार आणि 14 गावांचे सरपंच या समितीचे सदस्य आहेत. योगीता या समितीची अध्यक्ष आहे. योजना सुरू झाल्यावर नऊ लाख रुपयांची थकबाकीसुद्धा वसुल झाली. 

"फेरुल' वापरणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत 
नळाला मोटार लाऊन जादाचे पाणी ओढण्याचे प्रकार ग्रामीण भागात सर्रास घडतात. फेरुलमुळे नळाला मोटार लावून पाणी ओढण्याचा प्रयत्न केला तरीही वेग वाढणार नाही, पण विजेचे बिल मात्र वाढते. हे उपकरण लावल्यामुळे गावातील शेवटच्या घरात देखील पाणी पोचण्याची शाश्‍वती आहे. फेरुल चे सील तोडण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. शितलवाडीमध्ये सर्व नळांना ते लावण्यात आले. ही योजना राबविणारी शितलवाडी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. 

सरपंचांची तालुकास्तरीय सभा 
सररंचांची तालुकास्तरीय सभा व्हावी, हा मुद्दा योगीताने निती आयोगाच्या बैठकीत मांडला होता. या सभेत सरपंचांसह तहसीलदार, संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, अभियंते यांची उपस्थिती आवश्‍यक असावी, अशी सुचना होती. जेणेकरुन चौथी/पाचवी पास/नापास सरपंचांना अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. त्याची दखल घेत नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे पत्र उपविभागीय अधिकऱ्यांमार्फत दिले. पुढील महिन्यापासून रामटेक येथे सरपंचांची तालुकास्तरीय सभा घेण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com