tanishaka tata trust | Sarkarnama

तनिष्का करणार "डिजिटल' साक्षरता, टाटा ट्रस्ट, गुगलच्या बरोबर साडेतीन हजार गावांत लवकरच काम

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जून 2017

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत चौदा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या यशस्वी होत असतानाच नऊशेहून अधिक तनिष्का आता महाराष्ट्रात "इंटरनेट साथी' म्हणून काम करणार आहेत. टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया आणि सकाळ सोशल फाउंडेशन यांच्या या संयुक्त प्रकल्पात राज्यातील सुमारे तीन हजार 692 गावांत डिजिटल परिवर्तनाच्या दूत म्हणून "तनिष्का' काम पाहतील. 

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत चौदा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या यशस्वी होत असतानाच नऊशेहून अधिक तनिष्का आता महाराष्ट्रात "इंटरनेट साथी' म्हणून काम करणार आहेत. टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया आणि सकाळ सोशल फाउंडेशन यांच्या या संयुक्त प्रकल्पात राज्यातील सुमारे तीन हजार 692 गावांत डिजिटल परिवर्तनाच्या दूत म्हणून "तनिष्का' काम पाहतील. 
समाजोपयोगी कामांमध्ये अग्रेसर असलेला टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडियाच्या या प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून देशातील बारा राज्यांतील 82 हजार गावांत 23 हजार "इंटरनेट साथी' ग्रामीण महिलांसाठी इंटरनेट वापरातून रोजगाराच्या संधी शोधून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम करीत आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सकाळ सोशल फाउंडेशन राज्यातील 33 जिल्ह्यांतल्या 246 तालुक्‍यांत 924 तनिष्कांच्या मदतीने काम करणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून तनिष्का कोकणातील रायगडपासून कोल्हापूर, नंदुरबारचा दुर्गम आदिवासी भाग ते विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतल्या तीन हजार 692 गावांतल्या सुमारे सहा लाख स्त्रियांपर्यंत आता नेहमीच्या कामांव्यतिरिक्त इंटरनेट साथी म्हणून पोचणार आहेत. 
पूरक सामाजिक, सांस्कृतिक वातावरण आणि साधनांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांचे इंटरनेट वापरून माहिती घेण्याचे प्रमाण कमी आहे. "इंटरनेट साथी' त्यावर मात करण्याचा एक प्रयत्न आहे. दहावी, बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा आणि समाजात वावरण्याची थोडी तयारी असणाऱ्या, स्मार्ट फोन, टॅब वापरू शकणाऱ्या ग्रामीण भागातील महिलेला साथी म्हणून काम करण्याची संधी मिळते. "इंटरनेट साथी'च्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक यशोगाथा साकारल्या आहेत. इंटरनेटचा वापर करून ग्रामीण भागात स्त्रियांनी दारूबंदी केली. इंटरनेटवरून कपड्यांच्या नव्या फॅशन त्या शिकतात, आरोग्याची, शेतीची माहिती घेतात. ग्रामीण स्त्रियांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, नवनव्या माहितीचे दालन त्यांच्यापुढे खुले व्हावे हा हेतू या प्रकल्पात साध्य झाला आहे. 

एक साथी पोचते सहाशेजणींपर्यंत 
इंटरनेट साथी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. एक इंटरनेट साथी ती राहत असलेल्या गावाखेरीज लगतच्या तीन ते पाच गावांतील सुमारे सहाशे ते आठशे स्त्रियांना सहा महिन्यांत इंटरनेटच्या वापराची माहिती देते. त्यासाठी तिला टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया यांच्याकडून फोन आणि टॅब तर मिळतोच, शिवाय टाटा ट्रस्ट मानधनही देते. समाजबदलाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या तनिष्का सदस्या ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता रूजवण्याच्या अनोख्या प्रकल्पात आता सहभागी होत आहेत. गुरुवार (ता. 15) पासून पहिल्या टप्प्यातल्या इंटरनेट साथींचे प्रशिक्षण राज्याच्या विविध भागांत सुरू होत आहे. 

सर्वांत मोठे डिजिटल नेटवर्क 
पुढील दोन वर्षांत (2019 पर्यंत) देशातील तीन लाख गावांपर्यंत पोचण्याचे टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडियाचे उद्दिष्ट आहे. सुमारे 90 हजार प्रशिक्षित इंटरनेट साथी असलेले हे भारताच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठे डिजिटल नेटवर्क असेल. ग्रामीण भारतातल्या एक कोटींहून अधिक लोकांना सध्या या प्रकल्पाचा लाभ मिळतो आहे. पुढील दोन वर्षांत पाच कोटी लोकांना याचा लाभ मिळावा, असे नियोजन आहे. गेल्या चार वर्षांत पाणी, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आपल्या कामाद्वारे ठसा उमटवणाऱ्या तनिष्का व्यासपीठाला जागतिक पातळीवर नावाजलेल्या टाटा ट्रस्ट आणि गुगलसारख्या संस्थांबरोबर या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. 

 

संबंधित लेख