Take action against those officers who have given one rupee as crop insurance to Farmers : Sangita Thombre | Sarkarnama

शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी एक रुपया देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : संगीता ठोंबरे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 जुलै 2018

केज तालुक्यातील  साडेसहाशेवर शेतकऱ्यांना  पीक  विमा म्हणून फक्त एक रुपया मिळाला.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे . पिक विमा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 

बीड : एकीकडे  निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक  लागत नाही .  दुसरीकडे विमा कंपनी आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना खिंडीत गाठत आहे. केज तालुक्यातील साडेसहाशे शेतकऱ्यांना एक रुपया पीक  विमा देऊन चेष्टा केल्याने शेतकरी संतप्त आहे. पिक विम्याचा विषय मंगळवारी भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी अधिवेशनात उपस्थित केला. 

पिक विमा मंजूर करण्याचे निकष कोणते अशी विचारणा करुन चुकीचे पंचनामे करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी संगीता ठोंबरे यांनी केली. 

जिल्ह्यातील शेती हंगामी आणि पावसावर अधारित असल्याने शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतात. विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत तर करावीच लागते. शिवाय पिक संरक्षण हप्त्यापोटी मोठी रक्कमही भरावी लागते. मात्र, पिक विमा कंपनीची वक्रदृष्टी आणि शासनाच्या विविध विभागांच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा नुकताच मंजूर झाला.

मात्र, खात्यांवरील रकमा संताप व्यक्त करायला लावणाऱ्या आहेत. केज तालुक्यात ६६३ शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा मंजूर झाला आहे. तर २५० शेतकऱ्यांना ५ किंवा १० रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत  शेतकरी संतप्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार संगीता ठोंबरे यांची भेट घेऊन  न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

यावर श्रीमती ठोंबरे यांनी मंगळवारी नागपूर अधिवेशनात हा विषय औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. विमा मंजूरीचे निकष कोणते याची माहिती विचारुन पिकांचा चुकीचा पंचनामा करुन चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची  मागणीही त्यांनी केली.

कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी पिकविम्यापोटी किमान ५०० रुपये शेतकऱ्याला दिले जातील असे जाहीर केले आहे . आता संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागलेले आहे . 

संबंधित लेख