take action against service centers - Devendra Fadanvis | Sarkarnama

कर्जमाफी अर्जाचे शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेणाऱ्या सेवा केंद्रांवर कारवाई करा  - मुख्यमंत्री 

संजय मिस्कीन  : सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई   : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही 'मिशन मोड' वर करण्यात यावी; तसेच कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील, याची दक्षता घेऊन अर्ज नोंदणीच्या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

मुंबई   : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही 'मिशन मोड' वर करण्यात यावी; तसेच कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील, याची दक्षता घेऊन अर्ज नोंदणीच्या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. शेतकरी कर्जमाफी, पीक व पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

 बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे, व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी पुणे येथून सहकार मंत्री सुभाष देशमुख, बुलढाणा येथून कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, यवतमाळ येथून पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते. 

कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्यासाठी 'आपले सरकार'  सेवा केंद्रे अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवावीत. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, सर्व यंत्रणा गतिमान करावी. कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांना प्रती अर्ज 10 रुपये शुल्क देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेण्याच्या तक्रारी आल्यास अशा सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी. बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये तांत्रिक त्रुटी असलेल्या ठिकाणी ते दुरुस्त करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हानिहाय शेतकरी कर्जमाफीसाठी झालेल्या नोंदणी आणि प्राप्त अर्जाचा आढावा घेतला. राज्यात झालेल्या पावसाचे प्रमाण, जुलै व ऑगस्ट मध्ये पडलेला पावसाचा खंड, पीक पेरा तसेच कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांतील पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेऊन यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 
 

संबंधित लेख