Tahasildar Jayashri Ahirrao transfer , women weep leaders smile | Sarkarnama

तहसीलदार जयश्री अहिररावांच्या बदलीने महिला रडल्या, पण पुढाऱ्यांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य !

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

या बातमीने सोशल मिडीयावर 'अन्यायकारक बदली' संबोधना करीत प्रशासनाविरोधात प्रतिक्रीयांचा पाऊस पडला. अनेकांनी सरकारचा निषेध केला.

नाशिक :  तहसीलदार जयश्री अहिरराव गेले वर्षभर घरोघरी जनसंपर्काने चर्चेत होत्या. त्या विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा होती. त्यांची बॉडी लॅंग्वेज हाच संदेश देत होता. त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांना राजकीय आव्हान होते. या पार्श्‍वभूमीवर अहिरराव यांची बदली झाली. या बदलीने अनेक नेत्यांचा जीव भांड्यात पडला. नेते आनंदले. मात्र आपल्याला रेशनकार्ड कसे मिळणार या चिंतेने एक महिला तहसीलदारांच्या गळ्यात पडून रडली. 

'तहसीलदार तुमच्या दारी' हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच नाशिकच्या तहसीलदार श्रीमती अहिरराव यांनी राबविली. अगदी निवडणूक आचारसंहितेत तो सुरु राहिल्याने शिवसेनेचे स्थानिक आमदार योगेश घोलप यांसह अन्य इच्छुक सावध झाले होते. याबाबत वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी, नाराजीचा राग आळवुन झाला होता. या काळात वाळू माफीयांवर मेहेरबानी दाखविणे , कारवाईकडे दुर्लक्ष अशा कारणांनी त्यांची विभागांतर्गत चौकशीच्या बातम्याही आल्या.

 दुसरीकडे गावोगावी झोपडपट्टी, गरजुंना घरपोच रेशन कार्ड मिळु लागल्याने ते खुश होते. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांची संजय गांधी निराधार योजनेकडे बदली झाली. बदली रद्द करण्यासाठी श्रीमती अहिरराव यांनी केलेले प्रयत्नही व्यर्थ ठरले. यावेळी आलेल्या महिला तहसीलदारांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या खरेच रडल्या की तो 'फंडा' होता हे मात्र कळले. याविषयी श्रीमती अहिरराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काहीही प्रतिक्रीया दिली नाही. शीवकुमार निळकंठ यांची तहसीलदार म्हणुन नियुक्ती झाली. त्यामुळे राजकीय नेते, आमदार मात्र प्रतिस्पर्धी कमी झाल या अपेक्षे आनंदीत झाले. 

या बातमीने सोशल मिडीयावर 'अन्यायकारक बदली' संबोधना करीत प्रशासनाविरोधात प्रतिक्रीयांचा पाऊस पडला. अनेकांनी सरकारचा निषेध केला. एका फॉलोअरने 'कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ.आहिरराव यांनी सुट्टीतही काम केले. अठरा हजार रेसन कार्ड वाटले. सायंकाळी सात वाजता कॅम्प घेतले. जनतेचे काम जादूच्या काडीसारखे काम केले. अशा महान मॅडमची अन्यायकारक, तडकाफडकी बदलीचा जाहिर निषेध.' अशी बोलकी पोस्ट  टाकली. त्यामुळे एका सामान्य तहसीलदाराची बदली चर्चेचा विषय ठरली. त्यातप्रस्थापित  राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित  हास्य दिसले.   

संबंधित लेख