संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या कथुआ प्रकरण उघड करणाऱ्या आणि एका निरपराध आठ वर्षाच्या मुलीच्या हत्येच्या रक्ताने हात माखलेल्या नराधमांना बेड्या ठोकणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून श्वेतांबरी शर्मा यांचे नाव प्रत्येकजण मोठ्या अभिमानाने घेतो आहे. या प्रकरणाचा छडा लावताना त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव होता, मात्र त्यांनी या दबावाला भीक घातली नाही. मी कोणत्याच धर्माची नाही, पोलिसांच्या युनिफॉर्म हाच माझा धर्म आहे. मी एक पोलिस अधिकारी आहे असे त्या सांगून जातात.
कथुआप्रकरण हाताळताना त्यांना तुम्हीही हिंदू आहात हे लक्षात घ्या आणि सहकार्य करा असे सांगणाऱ्या नराधमाच्या पाठिराख्याना त्यांनी आपल्या कर्तव्यातून आपण कोण आहोत हे दाखवून दिले ते बरेच झाले.
जम्मूच्या कथुआ जिल्ह्यात नेमकं काय घडलं ? रेस्साना या हिंदू बहुसंख्य गावात बखेरवाल या पशुपालन करून पोट भरणाऱ्या मुस्लिम समाजाची एक छोटी वस्ती आहे. ती हटवून जागा रिकामी करण्याचा सांजेराम या माणसाचा डाव होता. सांजेराम जम्मू-काश्मीर सरकारचा एक निवृत्त महसूल अधिकारी. बखेरवालांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने आपला अल्पवयीन मुलगा आणि पुतण्या यांच्या मदतीने एक कट रचला.
गेल्या जानेवारीत जंगलात चरायला गेलेला आपला घोडा हरवला म्हणून असिफा ही आठ वर्षाची मुलगी त्याला शोधायला निघाली. सांजेरामच्या या दोन मदतनीसांनी तिचं अपहरण करून तिला गावाजवळील देवळात आणली. या देवळाचा ताबा सांजेरामकडेच असतो. झोपेच्या गोळ्यांचा पुरेसा साठा करून ठेवला गेला होता. असिफाला त्या खायला लावल्या गेल्या.
एक आठवडा, असिफाला बेशुद्धीत ठेवून सांजेराम, त्याचा हस्तक दीपक खजुरिया आणि ही दोन तरुण मुलं, यांनी या देवळात तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
दरम्यान, असिफा हरवल्याची पोलिस तक्रार दाखल झाली होती. माग काढत देवळापर्यंत आलेल्या पोलिसांना लाच देण्यात आली. शेवटी असिफाच्याच दुपट्ट्याने गळा आवळून तिचा खून करण्यात आला
त्यानंतर म्हणजेच 17 जानेवारीरोजी तिचा मृतदेह जंगलात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाची एक चौकशी समिती नियुक्त केली. अर्थात श्वेतांबरी शर्मा यांचाही या समितीत समावेश करण्यात आला. स्वत: शर्मा या जम्मू काश्मीर एसआयटीच्या एक महिला सदस्य आहेत. सरकारने शर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आणि हादरा देणाऱ्या या गुन्ह्यातील एक एक धागा उलगडू लागला.
खरे गुपित बाहेर आले आणि प्रत्येक भारतीयाची मन सुन्न झाले. हत्येपूवी या मुलीवर आळीपाळीने बलात्कार झाला होता त्यानंतर तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. हे उघड झाले.
या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू होता त्यावेळी मला आरोपींच्या सहकाऱ्यांनी तुम्ही ब्राह्मण असल्याची आठवण करून दिली. कारण कथुआ प्रकरणातील सर्व आरोपी हे ब्राह्मण होते. त्यांची आडनावे लक्षात घेता आपण सहानुभूती दाखवावी अशी विनंतीही मला करण्यात येत होती. जात, धर्माकडेही माझे लक्ष वेधण्यात आले. हे सर्व एका अधिकाऱ्याला सांगितले जात होते.
नराधमांना वाटत होते की मी हिंदू, ब्राह्मण आहे म्हणून त्यांना मदत करेन. त्यांना पाठीशी घालेन. पण, ते शक्य नव्हते. ज्या मुलीची हत्या झाली होती ती मुस्लिम होती आणि मारेकरी हिंदू होते. या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम असा रंग मला द्यायचा नव्हता. ज्या कोणी गुन्हा केला आहे.ज्यांचे हात निरपराध बालिकेच्या खुनाने माखले आहेत त्यांना कठोर शासन कसे मिळेल हेच माझे लक्ष होते. तपास करताना मी धर्म, जात पाहिला नाही. माझे कर्तव्य काय आहे ? आज मी कोण आहे ? हे प्रश्न मला माझे मन विचारत होते.
या प्रकरणाचा तपास करताना माझ्या मुलांकडे माझे दुर्लक्ष झाले. त्यांच्या परीक्षा असताना त्यांच्याजवळ मी बसू शकत नव्हेत. पण, ही जबाबदारी पतीने पार पाडली. त्यामुळे मी आणि माझे चौकशी पथक कामाला लागलो. रात्रंदिवस एक केला आणि खऱ्या गुन्हेगारांचा शोध लावला. ही हत्या नेमकी कशासाठी आणि का करण्यात आली याची माहिती संपूर्ण देशाला कळली.
जम्मू-काश्मीर सरकारही आमच्या पाठीशी होते. या प्रकरणाचा तपास पुढे सीबीआयकडे गेला असला तरी हे प्रकरण खोदून काढण्यात श्वेतांबरींचा सिंहाचा वाटा आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण देश त्यांना सॅल्यूट करतो आहे. मी हिंदू, ब्राह्मण किंवा कुठल्याही जातीच नाही, पोलिसांच्या युनिफॉर्म हाच माझा धर्म असल्याचे त्या अभिमानाने सांगतात यातच सर्व काही आले.