swabhmani zilla president hugs sadabhau | Sarkarnama

`स्वाभिमानी' च्या जिल्हाध्यक्षांची सदाभाऊंशी गळाभेट

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात अलिकडे विळ्या भोपळ्याचे वैर सुरू झाले असताना कोल्हापुरातील एका कार्यक्रमात "स्वाभिमानी' चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी श्री. खोत यांची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली. गळ्यात गळे घालून या दोघांना चर्चा करताना पाहणारेही आश्चर्यचकित झाले. 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात अलिकडे विळ्या भोपळ्याचे वैर सुरू झाले असताना कोल्हापुरातील एका कार्यक्रमात "स्वाभिमानी' चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी श्री. खोत यांची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली. गळ्यात गळे घालून या दोघांना चर्चा करताना पाहणारेही आश्चर्यचकित झाले. 
कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभासाठी श्री. खोत रविवारी (ता. ४) कोल्हापुरात होते. पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. शासनाच्या कृषी विभागाचा कार्यक्रम असल्याने श्री. शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच खासदार, आमदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. पण "म्हाडा' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक व उपाध्यक्ष पाटील वगळता एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. 

याच कार्यक्रमाला "स्वाभिमानी' चे प्रतिनिधी म्हणून जिल्हाध्यक्ष काटे उपस्थित होते. व्यासपीठावर ते श्री. खोत यांच्या मागच्या खुर्चीवर बसले होते. दोघांची नजरानजर झाल्यानंतर श्री. काटे यांनी त्यांच्या गळ्यात हात घालून चर्चा सुरू केली. बराच वेळ हे दोन नेते हास्यकल्लोळात बुडाले होते. श्री. खोत मंत्री झाल्यापासून त्यांचा श्री. शेट्टी यांच्याशी वाद सुरू झाला. त्यातून श्री. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी झाली. त्यामुळे तर या दोघांत तीव्र मतभेद तयार झाले.

गेल्या आठवड्यात "स्वाभिमानी' च्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यात श्री. खोत यांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे तर या दोघांतील वाद आणखीनच चिघळला. अलिकडे हे दोन शेतकरी नेते एकमेकांविरोधात वैयक्तीक पातळीवर उतरले आहेत. त्यातून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू आहे. दोघांच्याही संघटनांचे कार्यकर्तेही या वादात सोशल मिडीयाव्दारे तेल ओतत आहेत. अशा परिस्थितीत "स्वाभिमानी' च्या जिल्हाध्यक्षांनी श्री. खोत यांची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलच!

संबंधित लेख