Swabhimani Shetkari Sadabhau Khot Raju Shetti | Sarkarnama

सदाभाऊ खोत- राजू शेट्टी यांच्यातली दरी रुंदावली 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी पुण्यात एकाच विश्रामगृहात उतरल्यानंतर समोरासमोर होणारी भेट टाळण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील दुसऱ्या विश्रामगृहात जाणे पसंत केले. त्यामुळे या दोघांमधील नाराजीची चर्चा आणखी जोरात सुरू झाली आहे. 

पुण्यात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी नेहमीच उतरतात. नेहमीप्रमाणे ते या विश्रामगृहात उतरले. दरम्यान, राज्यमंत्री खोत यांच्या मुक्कामाची तयारीदेखील याच विश्रामगृहात करण्यात आली. मात्र खासदार शेट्टी यांचा मुक्‍काम असल्याचे लक्षात आल्यानंतर खोत यांनी या विश्रामगृहात जाण्याचे टाळत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विश्रामगृहात जाणे पसंत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा न करताच खोत यांच्याकडे सुमारे तीन महिन्यापूर्वी अतिरिक्त खात्यांचा कार्यभार दिला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत खोत यांच्या मुलाने उडी घेतली. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी मुलांना निवडणुकीत उभे करू नये, अशी भूमिका मांडत खासदार शेट्टी यांनी खोत यांच्या मुलाच्या निवडणुकीला विरोध केला. ते तेथे प्रचारालाही गेले नाहीत.

गेल्या काही दिवसातील दोघांच्या वक्तव्यावरून या दोघात कमालीचे मतभेद असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर खोत यांनी आज विश्रामगृहात येण्याचेच टाळल्याने त्यावर शिक्कामार्तब झाले आहे. खोत यांची भाजपकडे वाटचाल सुरू झाल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ही चर्चा खरी ठरावी या दिशेनेच केल्या काही दिवसातील घडामोडी घडत आहेत. या संदर्भात खासदार शेट्टी व राज्यमंत्री खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

उमेश घोंगडे 

संबंधित लेख