swabhimani sanghatana | Sarkarnama

"स्वाभिमानी' च्या कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

रवीकांत तुपकरांच्या या भूमिकेचे शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तुपकरांच्या राजीनाम्यानंतर आता वऱ्हाडातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शासकीय समित्यांचे सदस्य पदाचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलनाचे रान पेटविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रवीकांत तुपकर यांनी वस्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा दिलेल्या राजीनाम्यानंतर पश्‍चिम विदर्भात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय समित्यांच्या सदस्य पदावरून राजीनामे देणे सुरू केले आहे. त्यामुळे भाजप सरकारविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची धार अधीक तीव्र होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करण्यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास भाजप प्रणीत केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुण्यात संघटनेच्या झालेल्या बैठकीनंतर लगेच राज्य सरकारच्या वस्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी तडकाफडकी महामंडळाचे अधिकारी, वाहनासह इतरही सुविधांचा त्याग केला. 

रवीकांत तुपकरांच्या या भूमिकेचे शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तुपकरांच्या राजीनाम्यानंतर आता वऱ्हाडातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शासकीय समित्यांचे सदस्य पदाचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काल बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव मोरे व संघटनेचे पदाधिकारी राणा चंद्रशेखर चंदन यांनी शासकीय दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे राज्याचे कृषी मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. 

राज्यातील इतरही जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही लवकरच शासकीय समित्यांच्या सदस्य पदाचे राजीनामा सत्र सुरू होणार असल्याने सत्ताधारी भाजप समोर स्वाभिमानीचे कडवे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 

संबंधित लेख