swabhimani morcha | Sarkarnama

कर्जमुक्तीसाठी 22 मेपासून पुणे-मुंबई पदयात्रा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी अनेक आश्‍वासने दिली. "अच्छे दिन' येतील म्हणून सांगितले, त्यांच्या या अच्छे दिनमुळे आम्हीही भारावून गेलो पण आमच्या वाट्याला हे दुपारचे कडकडीत ऊन आले.- राजू शेट्टी, खासदार 

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 22 मेपासून पुणे-मुंबई पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म राज्यपाल सी. विद्यासागर यांना देण्यात येतील, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान, नुकत्याच संपलेल्या साखर हंगामातील उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 500 रुपये 22 मेपर्यंत न दिल्यास कारखान्यांच्या गोदामातून एक पोतही साखर बाहेर पडू देणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. 

राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सभेत बोलताना श्री. शेट्टी म्हणाले,"शेतकरी आत्महत्येचे लोण कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोचले आहे, अशा परिस्थितीत आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही. देशभरातील विजय मल्ल्यासारख्या 5 हजार बड्या उद्योगपतींनी 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविले, दोन-चार हजार रुपयांसाठी बॅंक ऑफ इंडिया गुंड पाठवणार असतील तर त्यांचा बंदोबस्तही आम्ही करू. पाच हजारासाठी त्रास दिला तर कायदा गेला चुलीत आम्ही शेतकऱ्यांच्या रक्षणासाठीकायदा हातात घेऊ. येथून पुढे हे सहन करणार नाही.' 

ते म्हणाले," या देशात तूर उत्पादकांना बाजारभाव मिळाला असता तर दोन लाख 93 हजार कोटी रुपये मिळाले असते. पाकिस्तानातून कांदा आयात केला नसता तर कांदा उत्पादकाला 92 हजार कोटी मिळाले असते. मुख्यमंत्री फडणवीस हे विरोधी पक्षनेते असतानाचा दर सोयाबीनला आता मिळाला असता तर 93 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असते. पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाही, म्हणूनच कर्जमुक्‍तीची मागणी आम्ही करत आहोत. दया म्हणून किंवा मेहेरबानी समजून ही कर्जमुक्ती नको. शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक द्यायला 21 हजार कोटी रुपये आहेत तर शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाहीत. ज्यांच्या जिवावर सरकार आले, ज्यांनी तुम्हाला मदत केली तेच शेतकरी तुम्हाला पायाखाली तुडवायला कमी करणार नाहीत.' 

शेतकऱ्यांची खिल्ली उडवू नका, असा इशारा देऊन श्री. शेट्टी म्हणाले,"शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांच्यासारखे तथाकथित विद्वान कर्जमाफी नको अशी वक्तव्ये करत आहेत. जाणीवपूर्वक ही वक्तव्ये करून घेतली जात आहेत. सरकारने जनाची नव्हे तर मनाची लाज सोडलेली आहे. पण या समाजात जी शिकलेली माणसे आहेत, ज्यांना अजूनही शेतकरी शेती व्यवसायाबद्दल आस्था आहे. ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी खांद्यावर घोंगडे टाकून शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सांगितली. त्याच पद्धतीने या राज्यपालांना ही परिस्थिती सांगण्यासाठी साडेसहा लाख शेतकऱ्यांचा लेखाजोखा जो गोळा केला आहे, त्यांना भेटायला जाणार आहे. जाताना पुण्यातील फुले वाड्यात जाऊन त्यांचा आशीर्वाद रणरणत्या उन्हात मुंबईला पायी जाणार आहे.' 

ठाणे जिल्ह्यात समृद्धी मार्गासाठी जमीन गेलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गेलो होतो. तिथल्या आदिवासींनी मला सांगितले. मुंबईची नाकाबंदी करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा, आम्ही तयार आहोत. आमच्या पदयात्रेनंतरचा टप्पा असा असणार आहे. मुंबईचा दूध व भाजीपाला आपण थांबवायचा पाणी ते थांबवतील. यातून मुंबईची नाकाबंदी केली जाईल, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. यापूर्वी विधानभवनावर तूर फेकली, कांदा फेकला पण सरकारमधील कोणी त्याची दखल घेतली नाही. त्यांना कोणाला मला भेटायला वेळ नसेल. म्हणूनच राज्यपालांना भेटणार आहे, त्यांनी भेट दिली नाहीत तर काय करायचे ते ठरवू, असे श्री. शेट्टी म्हणाले. 

यावर्षीच्या साखर हंगामात एफआरपी व 175 रुपयावर तोडगा काढला, त्यावेळी साखरेचा दर 2800 रुपये प्रती क्विंटल होता. हंगाम संपताना हा दर चार हजारावर पोचला. वाढलेल्या दरातील काही वाटा बैठक घेऊन शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे बैठक घेणार होते, पण त्यांना त्याचा विसर पडला आहे. ज्यांच्या विरोधात दादा होते, त्यांनाच ते आता मिठ्ठ्या मारत आहेत पण आम्ही हे विसरलेलो नाही, असा टोलाही श्री. शेट्टी यांनी हाणला. 

 

संबंधित लेख