swabhimani morcha | Sarkarnama

मोदी, फडणवीस, चंद्रकांतदादांवर टीकास्त्र  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

मराठवाडा म्हणजे आत्महत्या वाडा झाला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला नकार दिला, मग कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली. कोल्हापुरातही चंद्रकांतदादा संघटनेविषयी काहीतरी बोलत आहेत. चंदूभाऊ तुम्ही एकदा परभणीला या, जगात जर्मनी आणि देशात परभणी काय आहे हे तुम्हाला दाखवतो, या शब्दात मराठवाड्याचे अमर कदम यांनी समाचार घेतला. 

कोल्हापूर : देशात व राज्यातही सरकारसोबत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री फडणवीस हे तर पोपटपंची आहेत, अशी टीका संघटनेचे अमर कदम यांनी केले तर चंद्रकांतदादा अखंड जिल्हा तुमचा नाही हे लक्षात ठेवा असा इशारा अजित पोवार यांनी दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्‍त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. 

संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार म्हणाले, "पालकमंत्री पाटील हे जिल्हा आपला आहे म्हणतात. ते थोरले भाऊ आहेत म्हणून असे म्हणत असतील पण वाटण्या करताना थोडा जादा वाटा त्यांनी घ्यावा पण अखंड कोल्हापूर त्यांचे नाही हे लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांची ही फौज निर्णय घ्यायला लावणारी आहे हेही लक्षात ठेवा.' 

जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले,"ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार आले त्यांच्याकडेच दुर्लक्ष करणार असाल तर या शेतकऱ्यांवर तुम्हाला तुडवायची वेळ आणू नका.आम्हाला हरामाचा पैसा नको तर घामाचे दाम द्या.' 
पुण्याचे अमर कदम म्हणाले,"सत्ता काबीज करायची होती म्हणून शेतकऱ्यांना खोटी आश्‍वासने सरकारने दिली. अजून आमची किती फसवणूक करणार आहात. आघाडी सरकारने हेच केले म्हणून त्यांना घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली त्याचे फळ हेच का ? मुख्यमंत्री फडणवीस हे तर पोपटपंची आहेत, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला वर बसवले तेच शेतकरी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.' 

प्रा. जालंदर पाटील म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता कर्जमाफी अवघड वाटत आहे. चाकोरीबाहेर जाऊन राहू दे पण चाकोरीत राहून ही कर्जमाफी देता येते. शेतकऱ्यांच्या उरावर ठाण मांडून राजकारणी सत्तेवर आले, पण त्याच शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत तरी मिळते का ?' 
राजेंद्र गड्यानवार म्हणाले,"संघर्ष यात्रा काढणारे सर्व साखर सम्राट आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांना बुडवले त्यांना यात्रा काढायचा नैतिक अधिकार नाही. गुजरामधल्या गणदेवी साखर कारखान्यासारखा दर द्या मगच यात्रा काढा.' 

या मोर्चाला राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट हेही उपस्थित होते. ते म्हणाले,"शेतकऱ्यांना भीक नको तर अधिकार हवा आहे. पंतप्रधान मोदी यांनी किसान आयोगाची स्थापना केली पण पुढे काही झाले नाही. हा पहिला आयोग मात्र सरकारी नोकरांना सातवा आयोगा लागू केला. पण शेतकऱ्यांना पहिल्या आयोगाचाही लाभ मिळालेला नाही. आम्ही गुजरातच्या शेतकऱ्यांनी संसदेला घेरावो घातला, त्यावेळी श्री. शेट्टीही सहभागी झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी यांना गुडघे टेकण्याची वेळ आली. अजून आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत भविष्यात राजस्थानचा शेतकरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल.' 

संबंधित लेख