गुजरातच्या अमूलला स्वाभीमानी दणका 

गुजरातच्या अमूलला स्वाभीमानी दणका 

पुणे : राज्यातील दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधून रेल्वेने मुंबईत येणारे सुमारे साडेचार लाख लिटर दूध घेऊन येणारी रेल्वे अचानक रद्द करण्यात आली. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर अमूलचे हजारो लिटर दूध घेऊन येणारे टॅंकर स्वत: खासदार राजू शेट्टी अडवून परत पाठविले तर वसई येथील अमूलच्या दूध केंद्रावर ठाण मांडून बसलेल्या खासदार शेट्टी यांच्यामुळे अमूलचे दूध मुंबईत येऊ शकले नाही. 

दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज तिसऱ्या दिवशी जोर धरला आहे. राज्यात ठिकठिकाणी दूधाचे टॅंकर अडविण्यात आले. काही ठिकाणी टॅंकरची तोडफोड करण्यात आल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. स्वाभिमानी बाल्लेकिला असलेल्या सावळवाडी, माळवाडी, दुधगांव व बागणी या गावांमध्ये बसचीदेखील तोडफोड करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावंराजा येथे दुधाचा टेम्पो रोखून दूध ओतून देण्यात आले. खामगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळ्याला जोडे मारून जाळण्यात आला. मेहकर मध्ये मंगळवारी रात्री दुधाचा टॅंकर फोडण्यात आला. चिखली शहरात बस फोडली तर देऊळगाव राजा मध्ये दुधाची गाडी अडवून शेकडो लिटर दूध ओतून देण्यात आले. 

गुजरातमधून येणारे अमूलचे दूध रोखण्यासाठी खासदार शेट्टी स्वत: रस्त्यावर उतरले असून गुजरातच्या सीमेवर दाबचेरी चेकनाक्‍यावर त्यांनी मुक्काम ठोकला होता. भोईसर येथील अमूलच्या केंद्रावरदेखील त्यांनी स्वत: आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्यापासून खासगी बस व सार्वजनिक वाहने लक्ष्य केली जातील. आंदोलनाला हिंसक वळण लागले तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com