suvendra gandhi and dipti gandhi's nomination rejected | Sarkarnama

खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र, स्नुषा दिप्ती यांचे अर्ज बाद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

तरी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद असल्याने हे सर्व उच्च न्यायालयात जातील.

नगर : महापालिका निवडणुकीच्या अर्जांच्या छानणीत भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र गांधी व स्नूषा दिप्ती गांधी यांचे अर्ज बाद झाले आहेत. याबरोबरच भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक अर्जाचाही समावेश आहे. यांच्यासह अकरा अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. आज पहाटे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निकाल जाहीर केला.

दरम्यान, अर्ज बाद झाले असले, तरी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद असल्याने हे सर्व उच्च न्यायालयात जातील. त्यानंतर त्यांच्या लढतीबाबत चित्र स्पष्ट होईल.

उमेदवारांचे अर्ज छाननीस काल सकाळपासून सुरुवात झाली. महापालिका प्रशासनाकडे ७१५ अर्ज दाखल झाले होते. काल सायंकाळपर्य़ंत त्यातील ११ अपक्षांचे अर्ज बाद झाल्याचे जाहीर केले होते. हरकती असलेल्या उर्वरित २७ अर्जासंदर्भात सुनावणी सुरू होती. विशेषतः अनधिकृत बांधकाम, महापालिकेकडील थकबाकी, अतिक्रमणे, दंड रकमेची थकबाकी, अपूर्ण अर्ज अशी कारणे हरकतींमध्ये होती. जुन्या महापालिकेच्या कार्यालयात सुनावणी सुरू असल्याने तेथे पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. रात्रीही नागरिकांची गर्दी होती.

बाद झालेल्या अर्जांमध्ये भाजपचे सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चौघांचा समावेश आहे. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे, अपक्ष सय्यद सादीक आरिफ आदींचे अर्ज बाद झाल्याचे पहाटे जाहीर करण्यात आले. 

सुवेंद्र गांधी यांच्या अर्जावर शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव व राष्ट्रवादीचे उमेदवार नज्जू पहिलवान यांनी हरकत घेतली होती. अतिक्रमणाचा आरोप त्यांत नमूद करण्यात आला. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्या घरावरील अनधिकृत मोबाईल टॉवर व त्याच्या कराच्या थकबाकीबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय घुले यांनी हरकत घेतली होती. 

या हरकतींवर सुनावनी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निकाल ११ वाजता जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी काही अर्जावरील निर्णय दिला, मात्र महत्त्वाच्या उमेदवारांचे निकाल पहाटे अडीच वाजता देत वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. 
 

संबंधित लेख