suvarna hole in rebel mood in shrigonda | Sarkarnama

नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा होले बंडाच्या तयारीत; पाचपुतेंना टेन्शन! 

संजय काटे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

आम्ही भाजपाचेच आहोत मात्र

श्रीगोंदे (नगर) : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी आमचे कुटूंब एकनिष्ठ राहिले आहे. यापुर्वी तीनवेळा संधी असतानाही पदासाठी नेत्यांना अडचणीत आणले नाही. यावेळी मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत आपण प्रबळ दावेदार आहोत. भाजपातूनच उमेदवारी करायची असून नेतेही देतील मात्र काही अडचण आल्यास आपणाकडे सगळे पर्याय खुले असल्याचा दावा सुवर्णा होले यांनी केला. 

भाऊसाहेब व सुवर्णा होले हे पाचपुते यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात सुवर्णा होले या व्यासपिठावर आल्याने तेथेच भाजप फुटीचे संकेत मिळाले होते. 

याबाबत होले म्हणाल्या, आम्ही भाजपाचेच आहोत मात्र वेगळ्या कार्यक्रमाचा निरोप आल्याने आम्ही तेथे गेलो होतो. सध्या नवरात्रोत्वसाचे स्वंतत्र कार्यक्रम शहरात ठेवले आहेत. यापुर्वी पालीकेत तीन वेळा नगराध्यक्षपदाची संधी असतानाही नेत्यांच्या आश्वासनावर थांबलो आहे. आता होवू घातलेल्या पालीका निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी आपण लढणार आहोत. त्यासाठी भाजपालाच उमेदवारी मागत आहोत. पाचपुते यावेळी आमचाच विचार करतील ही खात्री आहे. मात्र थांबण्यास सांगितले तर मात्र आम्ही वेगळा विचार करणार आहोत. अपक्षांसह इतर पक्षांचे त्यासाठी पर्याय आहेत. नेत्यांनी जर आमचा विचार केला नाही तर निष्ठा नेमकी कशी असते याचा आम्हालाही विचार करावा लागेल. 

दरम्यान, होले यांच्या या आक्रमक भुमिकेमुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत आहे. अगोदरच विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे त्यांच्या पत्नी शुभांगी यांच्यासाठी आग्रही आहेत. माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे याही प्रबळ इच्छूक आहेत. या दोन्ही इच्छूकांनी मोठ्या प्रमाणात शहरात खर्च सुरु केला असतानाच आता होले सुध्दा शक्तीप्रदर्शनात उतरल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापुर्वीच पाचपुते गटापुढे ही गटबाजी थोपविण्याचे आव्हान आहे. 

संबंधित लेख