sushilkumar shinde on mohan bhagwat | Sarkarnama

मोहन भागवतांना अतिरेकी ठरविण्याच्या प्रकरणाशी संबंध नाही : सुशीलकुमार शिंदे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

पक्ष ज्या वेळी अडचणीत असतो, त्यावेळी मला संधी मिळते. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या पहिल्याच दौऱ्यात तेथील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष प्रथमच एकत्र आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशमधील कॉंग्रेस संघटनेत आणि सरकारमध्ये तूर्तास कोणतेही बदल होणार नाहीत. सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॉंग्रेसची सत्ता येईल.

-सुशीलकुमार शिंदे 

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अतिरेकी ठरविण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाल्याचे वृत्त आले आहे. 2008 मध्ये मी गृहमंत्री नव्हतो. त्या दैनिकाकडे पुरावे असतील त्यांनी प्रसिद्ध करावेत. आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता श्री. शिंदे यांनी आज कॉंग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर सध्याचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेजारच्या राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध आवश्‍यक आहेत. अमेरिका, पाकिस्तान येथे जाऊन तेथील पंतप्रधानांची गळाभेट घेण्यापेक्षा भारत-चीन सीमावाद निवळण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्‍यक आहेत. सध्या स्थितीत चिनसोबत युद्ध झाल्यास हा खर्च देशाला परवडणारा नाही. सध्याच्या केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण चुकत आहे. 

देशातील कॉंग्रेस नेत्यांच्या उद्योगांवर व घरावर सीबीआयच्या धाडी पडत आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशा धाडी पडत असल्याने कॉंग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार राजीनामा देऊन लगेच एनडीएसोबत गेले. या सर्व घडामोडी ज्या वेगवान पद्धतीने घडल्या आहेत त्या अर्थी नीतिशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. यापूर्वीही नीतिशकुमार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे भाजपचा घरोबा त्यांना नवीन नाही. आजपर्यंत ते करत असलेला धर्मनिरपेक्षपणाचा दावा आता फोल ठरल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांच्याबद्दल सोशल मिडियावरून नेतृत्वाच्या अपेक्षा व्यक्त होतात याबद्दल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया नावाने हिणवले जात होते. त्यांनी बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर त्यांचा उल्लेख आयर्न लेडी असा झाला. राजीव गांधी यांच्या बाबतीतही असेच घडले होते. हवाई जहाज चलानेवाला देश क्‍या चलऐगा अशी टीका होत होती. त्यांनी देशात माहिती प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून दाखविली. राहुल गांधी यांना देखील व्हीजन आहे. ते देखील या पद्धतीनेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. प्रियांका गांधी या तूर्तास राजकारणात येण्याची शक्‍यता नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख