Sureshdada Jain to join BJP ! | Sarkarnama

सुरेशदादा जैन यांचे  गलबत भाजपच्या बंदरात लागणार ! 

कैलास शिंदे - सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 8 मे 2017

जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री महाजन यांच्यात वाद आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसे यांची नाराजी आहे. त्याचवेळी दुसरीकडे भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्याशी सख्य जोपासले . कारागृहात असतांना जैन यांची त्यांनी भेट घेतली होती. जैन कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. 

जळगाव : सुरेशदादा जैन यापुढे  निवडणूक लढविणार नसले तरी ते आपले बळ कोणत्या पक्षाच्यामागे उभे करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

माजी महसूल मंत्री भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी असलेले राजकीय वैर आणि  जलसंपदामंत्री महाजन यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता सुरेश दादा जैन यांचे गलबत विविध पक्षांचा प्रवास करून अखेर भाजपच्या बंदरात नांगर  टाकणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . 

बेधडक आणि नीडर व्यक्तिमत्व असा लौकिक असलेले शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या निवडणुकीतील राजकीय जीवनाची निवृत्ती घोषित केली आहे. जळगाव शहराच्या राजकारणावर आजही त्यांची पकड आहे.

1985 पासून तर आजपर्यंत मधली दोन वर्षे वगळता जळगाव महापालिकेवर त्यांच्यांच नेतृत्वाखाली सत्ता आहे. निवडणूक न लढण्याची त्यांनी घोषणा केली असली तरी राजकीय संन्यास घेण्याऐवजी ते नेतृत्वाच्या भूमिकेत राहण्याची शक्‍यता आहे. पक्ष बदलण्यात कधीही कमीपणा बाळगला नाही, मात्र आपला राजकीय शेवट ते भाजपत करतील काय? याबाबत मात्र आता त्यांच्या समर्थकांसह विरोधकांतही चर्चा सुरू आहे. 

व्यापारी म्हणून असलेले सुरेशदादा जैन यांनी सन 1985 मध्ये त्यांनी जळगावच्या राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक पदापासून त्यांनी सुरूवात केली, त्यानंतर ते कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र पुढे त्यांनी वेळोवळी पक्ष बदलले. आपण हजार वेळा पक्ष बदलू असे स्पष्टपणेच सांगत असतात. 

त्यानीं अनेक वेळा पक्ष बदलले असले तरी जळगाव नगरपालिका तसेच महापालिकेवर त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. मात्र मध्यंतरी थेट नगराध्यक्ष निवडीच्या काळात त्यांचा उमेदवार पराभूत झाला अन भाजपची सत्ता आली परंतु ती केवळ दोनच वर्षे. त्यांनतर पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली महापालिकेवर सत्ता आली ती आजपर्यंत आहे.

 याशिवाय जिल्ह्यात त्यांनी जिल्हा बॅंकेवरही आपल्या नेतृत्वात कब्जा मिळवून सहकार क्षेत्रातही दबदबा निर्माण केला होता. जळगाव जिल्ह्यात आपले स्वतंत्र नेतृत्व निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. मात्र यश येत असतांना त्यांना संघर्षही करावा लागला . 

आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री असतांना समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हजारे व त्यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. 

पुढे जळगाव नगरपालिकेतील घरकुल गैरव्यवहारासंदर्भात तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जैन यांना अटक झाले ते तब्बल साडेचार वर्षे तुरूंगात होते. याच काळात विधानसभा निवडणूका लागल्या त्यानीं कारागृहात असतांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल केली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. जळगाव विधानसभा मतदार संघातील त्यांचा तो पहिलाच पराभव होता, त्यापूर्वी ते सतत नऊ वेळा निवडून आले होते. 

कारागृहातून जामिनवर सुटल्यानंतर जैन यांनी गेल्या सहा महिन्यापासून जाहीर कार्यक्रमांना जाणे टाळलेच होते. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवारांच्या जळगाव तालुक्‍यात प्रचार केला मात्र उमेदवारांना निवडून द्या या आवाहनापलीकडे त्यांनी कोणतेही राजकीय विधान केले नव्हते.

 मात्र त्यानी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात "मी निवडणूक लढविणार नाही' असे जाहीर केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जैन यांची जळगाव शहरातील राजकीय पकड पाहता ते सन्यास न घेता नेतृत्वाच्या भूमिकेत असण्याची शक्‍यता आहे. 

मात्र ते शिवसेनेतच राहतील काय, याबाबत मात्र साशंकता आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपमध्ये जाण्याची त्यांची शक्‍यता अधिक आहे. ते मोदी यांचे समर्थक आहेत, गुजरात भूकंप काळात त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मदत केली होती. मोदी यांच्या गुजरात पॅटर्न विकासाचे जैन यांनी वेळोवेळी जाहीरपणे कौतुकही केले आहे. 

महाजन-जैन यांच्यातील सख्य 
जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री महाजन यांच्यात वाद आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसे यांची नाराजी आहे. त्याचवेळी दुसरीकडे भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्याशी सख्य जोपासले . कारागृहात असतांना जैन यांची त्यांनी भेट घेतली होती. जैन कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. 

या शिवाय भाजपच्या विधानपरिषद उमेदवाराच्या विजयासाठी जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीने साथ दिली होती. एवढंच नव्हे तर भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष मंत्री महाजन यांनी जैन यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.

 त्यानंतर वेळोवेळी महाजन व जैन यांच्या भेटी होत आहेत. जामनेर येथे महाजन यांच्या निवासस्थानीही जैन गेले होते. त्यामुळे जैन भाजपमध्ये जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत. 

याआधीही भाजप प्रवेशाचा प्रयत्न 

जैन भाजपमध्ये जाण्यास यापूर्वीच तयार होते. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदीलही दर्शविला होता. परंतु, त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी विरोध केल्यामुळे जैन यांचा प्रवेश झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
परंतु आता खडसे यांचे पक्षात वर्चस्व नाही, शिवाय गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्य आहे. खडसे यांच्या नाराजीमुळे जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे महाजन यांनी दाखवून दिले आहे. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाला यश मिळाल्याचा दावा केला आहे. 

जळगाव महापालिकेत जैन यांच्या नेतृत्वात सत्ता आहे शिवाय जैन यांचे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात दबदबा आहे, जैन भाजपत आल्यास महापालिकेवर भाजपची सत्ता येईल आणि शत प्रतिशत भाजपचे समीकरण पूर्ण होईल असे महाजन पक्षाला पटवून देवू शकतात. 

सद्य स्थितीत महाजन आणि जैन यांचे असलेले सख्य पाहता महाजन यांनी प्रयत्न केल्यास जैन यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग खुला होईल, जैन आणि त्यांचे समर्थकही त्याला नकार देण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र जैन यांची खासदार होण्याची इच्छाअपूर्ण राहिलेली आहे. भाजप त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करून जळगाव शहरात आणि जिल्ह्यात आपले बळ वाढवू शकते . त्यामुळे जैन यांचा पुढचा प्रवास भाजपच्या मार्गावरून होणे अपरिहार्य दिसते आहे . 

संबंधित लेख