सुरेश प्रभू यांचा राजीनामा मोदींनी फेटाळला पण मंत्रिमंडळ विस्तारात अर्धचंद्र ?

रेल्वे मंडळाचे नवे अध्यक्ष लोहानीप्रभूंच्या "ट्विट'पूर्वी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला. तो स्वीकारून सरकारने "एअर इंडिया'चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
suresh-prabhu-4
suresh-prabhu-4

नवी दिल्ली  :  उत्तर प्रदेशात गेल्या पाच दिवसांमध्ये झालेल्या दोन रेल्वे अपघातांमुळे अडचणीत आलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा लगेच स्वीकारलेला नसला तरी आगामी काळातील मंत्रिमंडळ फेरबदलात प्रभू यांना डच्चू मिळणे निश्‍चित मानले जात आहे.

 यामुळे ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला गती मिळाली आहे. 

उत्कल एक्‍स्प्रेसला मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली येथे अपघात होऊन त्यात 24 जणांना प्राण गमवावे लागले होते. या अपघाताला रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याची टीका सुरू झाली आहे. विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

यामध्ये रेल्वे मंडळाच्या चार अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून अपघाताची चौकशी सुरू झाली. मंगळवारी  मध्यरात्री कानपूरजवळील औरय्या येथे कैफियत एक्‍स्प्रेसला अपघात होऊन 100 हून अधिक जण जखमी झाले .

त्यानंतर  सुरेश प्रभू यांच्यावर दबाव वाढल्याने त्यांनी नरेंद्र मोदींना भेटून राजीनामा देऊ केला. स्वतः प्रभू यांनी "ट्विट' करून ही माहिती दिली. "मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या अपघातांची नैतिक जबाबदारी मी घेतो आहे. पंतप्रधानांनी मला वाट पाहण्यासाठी सांगितले आहे,' असे या प्रभू यांनी "ट्‌विट'मध्ये म्हटले आहे. 

रेल्वेमंत्री पदावर असताना तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपण रक्त आणि घाम गाळून रेल्वेच्या भल्यासाठी काम केले. नुकत्याच झालेल्या अपघातांमुळे मोठा धक्का बसला आहे. प्रवाशांना प्राण गमवावे लागणे, ते गंभीर जखमी होणे यामुळे आपल्याला तीव्र दुःख झाले आहे. पंतप्रधानांच्या "न्यू इंडिया व्हिजन'नुसार त्यांना कार्यक्षम आणि अत्याधुनिक रेल्वेची आवश्‍यकता आहे. रेल्वे त्याच मार्गाने पुढे जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व  क्षेत्रांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेली जुनी व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी "ट्विट'द्वारे नमूद केले आहे. 

अर्थात, प्रभू यांनी यामध्ये त्यांनी राजीनामा या शब्दाचा उल्लेख केलेला नसला तरी संकेत स्पष्टपणे राजीनाम्याकडे आहे. परंतु, त्यांची गच्छंती रेल्वे अपघातांमुळे झाल्याचे चित्र जनतेपुढे जाऊ नये यासाठी मोदींनी तत्काळ राजीनामा स्वीकारणे टाळले असून या घटनाक्रमाला महत्त्व देण्याऐवजी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या प्रक्रियेतून प्रभू यांना वगळले जाईल, असे मानले जात आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी प्रभू यांच्या "ट्‌विट'ची प्रशंसा केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा प्रकार सरकारचे चांगले उत्तरदायित्व दर्शविणारा असल्याची टिप्पणी केली, तर मोदी सरकारमधील मंत्री पुढे येऊन कशी जबाबदारी स्वीकारतात हे यातून दिसते, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी यांनी व्यक्त केली.

परंतु, विरोधी पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेत प्रभूंना तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवा, अशी मागणी केली आहे. माजी रेल्वेमंत्री व लोकसभेतील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com