suresh prabhu may be bjp candidate in ratnagiri sindhudurg | Sarkarnama

#Loksabha2019 प्रभूंना मानणारा वर्ग आहे आणि भाजपकडे त्यांच्याशिवाय पर्याय नाही! 

शिवप्रसाद देसाई 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मतदार संघात नारायण राणेंच्या स्वाभीमान पक्षाची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ते स्वतंत्र उमेदवार देणार की भाजपला पाठबळ देणार यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. भाजपशी स्वाभीमानची आघाडी झाल्यास राणे या मतदार संघावर दाव करतील असे संकेतही त्यांनी या आधी दिले आहेत.  

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांना निवडणुक रिंगणात उतरवण्याची शक्‍यता आहे. 

भौगोलिकदृष्ट्या विचार करता सिंधुदुर्ग अख्खा आणि रत्नागिरीचा निम्म्यापेक्षा जास्त भाग व्यापणारा हा मतदार संघ दोडामार्गपासून चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. या ठिकाणी आजही शिवसेनेची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. संघटनेवरील पकड आणि दांडगा लोकसंपर्क असलेल्या श्री. राऊत यांना शह देण्यासाठी भाजप येथून प्रभू यांना उमेदवारी देण्याची शक्‍यता आहे. 

श्री. प्रभु मुळ सिंधुदुर्गातील मालवणचे आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरवातही सिंधुदुर्गातून झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1996 च्या निवडणूकीत मधु दंडवतेंचा करीष्मा असलेल्या राजापूर मतदार संघातून त्यांना पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. दंडवतेंचा पराभव करून खासदार झालेल्या प्रभूंना तेरा दिवसांच्या वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय उद्योगमंत्रीपद मिळाले होते. यानंतर सलग चार वेळा ते येथून खासदार झाले. 2009 च्या लोकसभा निवडणूकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

2014 ची निवडणूक त्यांनी लढवली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोअर टिममध्ये 2009 पासूनच ते सक्रीय होते. मोदींनी त्यांना राज्यसभेवर घेत थेट रेल्वे मंत्रीपद दिले. याच दरम्यान त्यांचा रितसर भाजप प्रवेश झाला. आत्तापर्यंत त्यांनी 15 पेक्षा जास्त खात्यांचा कारभार सांभाळला आहे. 

रेल्वे मंत्री असताना त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणले. मात्र ते पुन्हा येथून लढतील अशी शक्‍यता नव्हती. आता मात्र झपाट्याने राजकीय समीकरणे बदलत आहेत. प्रभु यांचे जिल्ह्यातील दौरे वाढले आहे. विविध विकास कामांवरून शिवसेना-भाजपमधील अदृश्‍य स्पर्धा तीव्र होवू लागली आहे.

गेल्याच आठवड्यात प्रभु यांनी कोकण रेल्वेच्या कामांबाबत आढावा बैठक घेत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा गती देणार असल्याचे सुतोवाच केले. लगेचच शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होवून चिपी विमानतळ सुरू करण्याचा मुहूर्त काढण्यात आला. हि स्पर्धा आगामी निवडणूकांचे तर संकेत देत नाहीत ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. 

या मतदार संघात संघटनात्मक दृष्ट्या शिवसेनेचे बळ आहे. त्यांचे संभाव्य उमेदवार राऊत यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तुलनेत भाजपचे संघटनात्मक बळ सर्वदूर नाही; मात्र प्रभु यांना मानणारा मतदार वर्ग आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख