Suresh Dhus start celbrations even the the results are with held | Sarkarnama

आणि सुरेश धस समर्थकांनी उडवले तोफांचे बार !

दत्ता देशमुख 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नगराध्यक्ष निवडीच्या नियोजित वेळेच्या पंधरा मिनीटे अगोदर खुद्द आमदार सुरेश धस व पुत्र जयदत्त धस यांच्या वाहनाचा ताफा नगरपंचायत जवळ आला. यातील वाहनांतून नऊ नगरसेवक उतरल्याने बाजी पलटली असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले.

बीड : पंधरा पैकी नऊ नगरसेवकांना सोबत घेऊन येत मतदान प्रक्रीया पार पडेपर्यंत सुरेश धस नगरपंचायत परिसरातच थांबून राहीले. न्यायालयाच्या निर्देशाने निकाल राखीव असला तरी त्यांच्या समर्थकांनी तोफा फोडल्याने निकाल काय, असेल याचा सर्वांनाच अंदाज आला आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघातील शिरुर कासार नगरपंचायतीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती . मात्र, त्यावेळी सुरेश धस राष्ट्रवादीत होते.

पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीवेळी धस समर्थक असलेले रोहिदास गाडेकर राष्ट्रवादीतच थांबले आणि पुन्हा नगराध्यक्षही झाले. 

पण दरम्यान सुरेश धस भाजपच्या छावणीत दाखल झाले . यानंतर सत्ताधारी गटाचे दोन नगरसेवक अपात्र ठरल्याने सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतीचे संख्याबळ १५ वर आले. सहाजिकच सत्ताधाऱ्यांचे बळही कमी झाले. त्यामुळे पुन्हा नगराध्यक्षांची निवड व्हावी यासाठी धस गटाने न्यायालयात धाव घेतली. 

त्यानुसार बुधवारी नगराध्यक्षपदाची निवडणुक झाली. कधीकाळी धसांचे कट्टर समर्थक असलेले रोहिदास गाडेकर राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर, धस गटाकडून मिरा गाडेकर उमेदवार होत्या. दरम्यान, नगराध्यक्ष निवडीच्या नियोजित वेळेच्या पंधरा मिनीटे अगोदर खुद्द आमदार सुरेश धस व पुत्र जयदत्त धस यांच्या वाहनाचा ताफा नगरपंचायत जवळ आला. 

यातील वाहनांतून नऊ नगरसेवक उतरल्याने बाजी पलटली असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. तर, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार रोहिदास गाडेकर हे देखील समर्थक नगरसेवकांसोबतच सभागृहाकडे आले पण त्यांच्यासोबतच्या नगरसेवकांची संख्या सहाच होती. 

निवडीची प्रक्रीया होईपर्यंत धस पिता - पुत्र परिसरातच ठाण मांडून होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार जरी निकाल राखीव असला तरी धसांसोबत आलेल्या नगरसेवकांच्या संख्येवरुन त्यांच्या समर्थकांनी निकालाचा काय तो अंदाज बांधत विजयाच्या तोफाही फोडल्या. यावर ता. १२ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत निकाल राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. 

संबंधित लेख