suresh dhas wins mlc election | Sarkarnama

पंकजाताईंचाच मास्टर स्ट्रोक ; सुरेश धस मोठ्या फरकाने जिंकले!

दत्ता देशमुख 
मंगळवार, 12 जून 2018

विविध राजकीय घटनांनी राज्यभर चर्चेत राहीलेल्या लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस 74 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला. 

बीड : विविध राजकीय घटनांनी राज्यभर चर्चेत राहीलेल्या लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस 74 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला. 

मतमोजणी आज उस्मानाबाद येथे झाली. हा पराभव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सुरुवातीपासून ही निवडणुक विविध राजकीय घटनांमुळे राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेची ठरली. लातूर - उस्मानाबाद - बीड हा स्थापनेपासून कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार संघ राहीलेला आहे.

अलिकडे सलग तीन टर्म (वर्षे) कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ज्यांचा आमदार त्यांची जागा या राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या सुत्रानुसार कॉंग्रेसने या जागेवर दावा केला होता. मात्र, ज्याची ताकद अधिक त्याची जागा असे नवे सुत्र राष्ट्रवादीच्या उत्साही नेत्यांनी मांडले आणि कॉंग्रेसकडून ही जागा हिसकावली. त्या बदल्यात कॉंग्रेसला दिलेली परभणी - हिंगोली या जागेवरही आघाडीला पराभव पत्करावा लागलेला आहे. कॉंग्रेसकडून ज्या पद्धतीने जागा हिसकावली त्या पद्धतीनेच भाजपमधील रमेश कराड यांना पक्षात आणून घाईघाईत उमेदवारीची माळही त्यांच्या गळ्यात घातली. पण, राष्ट्रवादीच्या या भागातील नेत्यांनी मारलेला तीर पक्षाच्याच अंगलट आला आणि कराडांनी माघार घेऊन सर्वांनाच तोंडघशी पाडले. यानंतर अपक्ष रिंगणात असलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली.

त्यानंतरही कराडांची माघार धक्का नसून निकालानंतर खरा धक्का असेल, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विशेषत: धनंजय मुंडे नेत्यांकडून छातीठोक सांगीतले जात होते. मात्र, निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा दावा किती पोकळ होता हे समोर आले.दरम्यान, राज्यातील इतर सहा स्थानिक स्वराज्य संघातील निवडणुकीपेक्षा ही निवडणुक सर्वाधिक चर्चेची राहीली. पात्र - अपात्रता या कारणांनी चर्चा झालेली निवडणुक अपात्र सदस्यांच्या मतदानावरुन न्यायालयात गेली होती.

त्यामुळे नियोजित मतमोजणी होण्यास दिवसांचा कालावधी लागला. अखेर या प्रकरणी सोमवारी न्यायालयाच्या निकालानंतर बीडच्या काकू - नाना आघाडी व एमआयएम सदस्यांचे मतदान एकत्र करुन ते मोजण्यात आले. मंगळवारी मतमोजणीत सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांचा पराभव केला. धस यांनी जगदाळेंचा पराभव केला असला तरी हा धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. 

संबंधित लेख