Suresh Dhas & Bharatbhushan Kshirsagar getting closer | Sarkarnama

भाजपच्या धसांसोबत राष्ट्रवादीच्या क्षीरसागरांची वाढती जवळीक !

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 डिसेंबर 2018

बीड नगरपालिकेच्या आणि शहराच्या राजकारणात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर गेल्या ३५ वर्षांपासून माहिर  आहेत .  काही  अपवाद वगळता सतत  पालिकेची सत्ता हाती ठेवणारे क्षीरसागर सुमारे  २० वर्षे नगराध्यक्ष राहीले आहेत. मात्र, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही .  

बीड : बीड नगरपालिकेच्या  राजकीय आखाड्यातील दिग्गज खेळाडू असलेल्या नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मागच्या ३४ वर्षांत अपवाद वगळता पालिकेवर कायम सत्ता ठेवली. विशेष म्हणजे, यातील २० वर्षांपेक्षा अधिक काळ नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात राहील्याने जिल्ह्यात त्यांची ओळख ‘अध्यक्ष’ अशीच आहे. मात्र, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्नही आहे. 

अलिकडे भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत त्यांची वाढलेली जवळीक हे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने तर नाही ना अशी अटकळ बीडच्या राजकीय आखाड्यात बांधली जात आहे. कारण, अशक्य वाटणारे राजकीय गणित जुळविण्यात सुरेश धस पारंगत आहेत. 

दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्या वारसांमध्ये पुढे आमदार जयदत्त क्षीरसागर विधानसभा, दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था तर धाकटे बंधू असलेले नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासाठी बीड नगरपालिका अशी राजकीय वाटणी  निश्चिती होती. ३४ वर्षांत अपवाद वगळता सत्तेच्या चाव्या त्यांच्याच हाती आणि २० वर्षांहून अधिक नगराध्यक्षपदाची माळही त्यांच्याच गळ्यात राहीली. 

एकूणच त्यांची राजकीय कामगिरी ‘भूषणावहच’ राहीली. मात्र, ‘अध्यक्ष’ असलेल्या भारतभूषण यांचे आमदारकीचेही स्वप्न आहे. तसे, त्यांना आमदार होऊ वाटणेही गैर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आखाड्यात नगरसेवकांच्या बळामुळे त्यांच्या भूमिकेला महत्व असते.

 म्हणूनच की काय अलिकडे भाजप आमदार सुरेश धस आणि क्षीरसागर यांच्यात वाढलेल्या जवळीकीतून हीच तर फिल्डींग लावली जात नाही ना असा अंदाज बांधला जात आहे.

तसे, भारतभूषण क्षीरसागर यांना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन काढल्याने आणि संदीप क्षीरसागर यांना पक्षातील एक गटाकडून बळ दिले जात असल्याने ते पक्षावर नाराज आहेतच. शिवाय लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धस यांच्या विजयाचा गुलाल त्यांनी थेट बीड पालिकेत खेळला होता. 

त्यांनतर या दोघांच्या भेटी गाठी तर वाढल्याच आहेत. पण, आष्टी येथे सुरेश धस यांच्या पुढाकाराने झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद॒घाटन कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या भारतभूषण क्षीरसागर यांना मानाचे स्थान होते. तर, काल शिरुर नगर पालिकेत राष्ट्रवादीला पराभूत करुन भाजपने विजय मिळविल्यानंतर सुरेश धस यांच्यासोबत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचाही नागरी सत्कार झाला आहे. 

त्यामुळे या दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडत आगामी निवडणुकीनंतर होणाऱ्या राज्यपाल नियुक्तीच्या १२ जागांच्या दृष्टीने आतापासूनच फिल्डींग लावली नाही ना असा अंदाजही या जवळीकीतून काढला जात आहे. कारण, अशक्य राजकीय गणित जुळविण्यात सुरेश धस पारंगत आहेत. 

राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर धसांनी मातब्बर दरेकर - धोंडे यांना तर  धुळ चारलीच होती. शिवाय याच क्षीरसागरांच्या घरात बसून त्यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निश्चित असलेले नाव काही मिनीटांत बदलून आपले समर्थक सय्यद अब्दुल्लांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती. 

तर, मागच्या वर्षी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात आणि लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशक्य विजय मिळवून त्यांनी राजकिय गणित जुळविण्याची आपली हातोटी सिद्ध केली आहे. त्यामुळे आपलेही आमदारकिचे गणित धस जुळवतील या अपक्षेने क्षीरसागरांनी धसांसोबत गट्टी वाढविली असल्याचीची चर्चा आहे.
 

संबंधित लेख