suresh dhas | Sarkarnama

सोळंके, पंडित यांच्याविरुद्ध प्राजक्ता धस यांची तक्रार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 एप्रिल 2017

औरंगाबाद : बीडमधील राष्ट्रवादीच्या माजी मंत्री व आमदारांमध्ये सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी हीन पातळी गाठली आहे. सुरेश धस विरुद्ध 

औरंगाबाद : बीडमधील राष्ट्रवादीच्या माजी मंत्री व आमदारांमध्ये सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी हीन पातळी गाठली आहे. सुरेश धस विरुद्ध 
प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांच्यातील तोंडी युद्धात एकमेकांच्या घरातील स्त्रियांचा जाहीरपणे उद्धार आणि अपमान केला जात आहे. बप्पी लहरी, सोंगाड्या, धोकेबाज, लुटारू, विश्‍वासघातकी अशी विशेषण देवून मीच कसा सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतील हे स्थानिक नेते करत आहेत. जिल्ह्यातील जनता मात्र या नाट्याकडे "टाईमपास' म्हणून पाहत आहे. धस यांना धमेंद्र व त्यांच्या पत्नीला हेमामालिनी म्हणत टीका केल्यानंतर प्राजक्ता धस यांनी प्रकाश सोळंके व अमरसिंह पंडित या दोघांविरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादी "टाईमपास पार्ट टू' ला सुरवात झाल्याचे दिसून येते. 

बीड जिल्हा परिषदेतील सत्ता धस यांच्यामुळे गमवावी लागल्याने या "धसक्‍यातून' राष्ट्रवादी काही केल्या सावरताना दिसत नाहीये. उलट एकमेकांची उणीदुणी काढत पक्षाची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम कधीकाळी मांडीला मांडी लावून बसणारे धस, सोळंके व पंडित हे राष्ट्रवादीतील नेतेच करत असल्याची चर्चा आता कार्यकर्ते करताना दिसत आहेत. निलंबनाची कारवाई करताना पक्षश्रेष्ठींनी कानफुक्‍यांचे ऐकून एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत धस यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेच गोळी चालवत असल्याचा आरोपही धस यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. त्यामुळे एकमेकांवरील आरोप खोडून काढतानाच नवे आरोप करण्यासाठी धस, सोळंके आणि पंडित यांच्यात पत्रकार परिषदा घेण्याची जणू स्पर्धा लागली आहे. धस यांच्या पत्नीने बदनामी केल्याप्रकरणी आष्टी पोलिसांत केलेली तक्रार आणि त्यावरून दाखल झालेला गुन्हा पंडित, सोळंके यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. यामागे देखील धस यांचेच डोके आहे हे लपून राहिलेले नाही. 
वैयक्तिक आरोप, बदनामी मात्र पक्षाची 
फिल्मी डायलॉगबाजी, विविध पात्रांची नावे देत एकमेकांचे कपडे फाडण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे. वैयक्तिक आरोप करतांना कुटुंबातील महिला व थोर मंडळीना देखील लक्ष्य केले जात असल्याने बीडकरांना राष्ट्रवादीतील या नेत्यांबद्दल आता संताप वाटायला लागला आहे. चोर, लुटारू, दरोडेखोर, जमीन हडपणारा अशा शब्दांत एकमेकांचा ही मंडळी उद्धार करीत असली तरी यातून राष्ट्रवादीत असेच लोक आहेत का? असा प्रश्‍न आता सर्वसामान्य लोक विचारू लागले आहेत. या तिघांच्या भांडणात राष्ट्रवादीची बदनाम होत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हा बिनपैशाचा तमाशा आता थांबवावा अशी मागणी देखील कार्यकर्ते करु लागले आहेत. 
क्षीरसागर-मुंडे यांचे मौनव्रत 
धस विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद विकोपाला गेलेला असतांना विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र या विषयावर मौनव्रत धारण केल्याचे दिसते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोप नाट्यातून रोज नवनवीन 
प्रकरणे उघड केली जात आहेत. प्रस्थापित विरुद्ध पक्षातील गरीब मराठा असा नवा वाद धस यांनी निर्माण केला. यावर पक्षातील मोठ्या नेत्यांनी मध्यस्थी करत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असतांना मुंडे-क्षीरसागर यांनी मात्र "दुरून डोंगर साजरे'ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे धस यांनी सोळंके,पंडित यांचा बोलवता धनी तिसराच असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळते. एकंदरीत राष्ट्रवादीची आणखी शोभा होऊ द्यायची नसेल तर पक्षश्रेष्ठींनी नेत्यांना समज देवून हा प्रकार तत्काळ थांबवण्याची नितांत गरज आहे. 
 

संबंधित लेख