निलंबनाच्या कारवाईने धस यांचा तोल सुटला

निलंबनाच्या कारवाईने धस यांचा तोल सुटला

बीड  :  जिल्हा परिषदेत भाजपला मदत करणारे माजीमंत्री व राष्ट्रवादीचे वजनदार नेते सुरेश धस यांना राष्ट्रवादीने बाहेरचा रस्ता दाखवत पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. पक्षाला सांगूनच आपण भाजपला साथ दिल्याचा दावा धस यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणारच नाही असा समज धस यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा झाला. पण पक्ष नेतृत्वाने उशिरा का होईना धस यांना त्यांच्या चुकीची शिक्षा दिल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तिकडे अनपेक्षितपणे झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे सुरेश धस यांचा मात्र तोल सुटताना दिसतो आहे. मेळावे आणि बैठकांमधून धस यांनी नेत्यांना दूषणे देत त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका सुरू केली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडणुकीच्या वेळी भाजपला मदत करण्याचे आदेश पाच समर्थक सदस्यांना देत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीशी पक्षद्रोह केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव करण्यासाठीच धस यांनी ही खेळी केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून हाकलण्याची मागणी सोळंके यांनी लावून धरली, कारवाई केली नाही तर मी पक्ष सोडतो अशी धमकी देखील दिली. एकंदरीत या सगळ्याचा परिणाम धस यांना सहा वर्ष पक्षातून निलंबित करण्यावर झाला. 

धस भाजपच्या वाटेवर 
राष्ट्रवादीने निलंबित केल्यावर पुढे काय या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी धस आष्टी मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. धस हे स्वयंभू आहेत, त्यामुळे ते ज्या पक्षात जातील तिथे आपले अस्तित्व निर्माण करतील असा विश्‍वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर धस यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित असल्याचे बोलले जाते. धस यांनी मात्र अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. धस भाजपत आले तर आपले काय? या विचाराने आष्टीचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे चिंतेत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे फारसे पटत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोंडेना शह देण्यासाठी धस यांना भाजपत प्रवेश दिला जाऊ शकतो. शिवसेना किंवा इतर पक्षात धस यांना प्रवेश करायला लावून विधानसभेच्या वेळी मदत करुन धोंडे यांचा पत्ता कट करण्याची रणनीती देखील भाजपकडून आखली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
धस यांची राष्ट्रवादीला धमकी 
निलंबनाच्या कारवाईनंतर सुरेश धस हे सैराट सुटल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले त्याच पक्षातील नेत्यांवर धस तोंडसुख घेताना दिसत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यावर माझे उपकार आहेत, त्यांचे माझ्यावर नाही अशा शब्दांत धस यांनी टीकास्त्र सोडले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना तर त्यांनी "कानफुक्‍या' ही उपाधी देऊन टाकली आहे. पक्षाने एकट्या धस यांच्यावर नाही तर दीड लाख कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचा दावा करत राष्ट्रवादीला धमकी दिली आहे. माझ्यावर केलेली कारवाई राष्ट्रवादीला महागात पडेल असा दम देखील धस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात भरला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com