बारामती तालुक्‍यातील तीन हजार मुलींना सायकल वाटप : सुप्रिया सुळे यांनीही चालविली पाच किलोमीटर सायकल! 

बारामती तालुक्‍यातील तीन हजार मुलींना सायकल वाटप : सुप्रिया सुळे यांनीही चालविली पाच किलोमीटर सायकल! 

बारामती : सायकल चालविल्याने प्रकृती उत्तम राहते, त्या मुळे सायकल नियमितपणे चालवा हा संदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीत दिला. मात्र भाषणातून हा संदेश देण्याअगोदर त्यांनी शारदा प्रांगण ते एमआयडीसीपर्यंत पाच किलोमीटर सायकल चालविली आणि मगच हा संदेश दिला. "मी नियमितपणे सायकल चालविते. तुम्हीही सायकल चालवायला लागा,'असे आवाहन त्यांनी केले. 

बारामती तालुक्‍यातील तीन हजार मुलींना सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. आज सकाळी शारदा प्रांगण ते एमआयडीसीपर्यंत मुलींची सायकल रॅली निघणार हे समजल्यावर सुप्रिया सुळे सकाळीच तेथे हजर झाल्या व सायकलवर बसून त्यांनी रॅली सुरु केली. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही रॅली झाली. खुद्द ताईच सायकल चालवत आहेत म्हटल्यावर मुलींनीही उत्साहाने ही रॅली पूर्ण केली. 

"दिवाळीत साडी नको; सायकल मागणार' 

दरम्यान भाषणात बारामतीच्या सर्व महिला नगरसेविका रॅलीत सहभागी झाल्याचा उल्लेख करत सुळे यांनी अजित पवार यांना सांगितले की या दिवाळीत सर्व नगरसेविका आपल्या नवऱ्यांना मला दिवाळीसाठी साडी नको सायकल द्या, अशी मागणी करणार आहेत. यावर अजित पवारही मिश्‍किलपणे गालातल्या गालात हसले. आज सगळ्यांना सायकली मिळाल्या पण मला आणि दादाला सायकल मिळाली नाही ही खंत त्यांनी हसत बोलून दाखविली. 

सवय नसल्याने हळूच काढता पाय 

दरम्यान सुप्रिया सुळे सायकल चालवित रॅलीचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा महिलांना नसल्याने त्या निर्धास्त होत्या, पण जेव्हा सुळे यांनी सायकलवर स्वार होत रॅलीचे नेतृत्व करण्यास सुरवात केली तेव्हा मात्र काही महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी हळूच काढता पाय घेतला. सायकल सोडून अनेक वर्षे झाल्याने आता सायकल चालविणे जमेल की नाही या भीतीनेच अनेकांनी हा बेत रद्द केला. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com