supriya sule on baramati loksabha | Sarkarnama

2029 पर्यंत मी बारामतीतून लढणार : सुप्रिया सुळे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

"मी माझ्या बारामती मतदारसंघात व कामात प्रचंड समाधानी आहे. बारामतीच्या जनतेचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मी बारामतीतून लढणार आहे. त्यानंतर कदाचित रिटायर्ड होईन', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

सातारा : "मी माझ्या बारामती मतदारसंघात व कामात प्रचंड समाधानी आहे. बारामतीच्या जनतेचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मी बारामतीतून लढणार आहे. त्यानंतर कदाचित रिटायर्ड होईन', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

संवाद जागर यात्रेनिमित्त येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये झालेल्या युवा संवाद यात्रेच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, संवाद यात्रेत आतापर्यंत अकरा कॉलेजमध्ये मी मुलामुलींची मते जाणून घेतली. यात शाळा, कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींमध्ये प्रचंड भितीचे वातावरण असल्याचे जाणवले, याची मला प्रचंड चिंता वाटते. शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादीची भुमिका काय असेल, या प्रश्‍नावर खासदार सुळे म्हणाल्या, रोज रूसणाऱ्या बायकोकडे नवराही फारसे लक्ष देत नाही. सध्या तशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. गेली तीन वर्षे आम्ही शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार हेच ऐकत आहोत. आता तो जोक झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भुमिकेचा येथे प्रश्‍नच येत नाही. अगदी ब्रम्हदेव खाली आला तरी आम्ही भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्‍न येत नाही. आणि एकटी सुप्रिया सुळे याबाबत निर्णय करू शकत नाही. 

नारायण राणेंनी कॉंग्रेस सोडली, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, राणे ज्येष्ठ नेते आहेत. ते निर्णय घेतील तो योग्यच असेल, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण संघटना सोडून गेले म्हणून विचार संपत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यवधी निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीची तयारी असेल काय, या प्रश्‍नावर खासदार सुळे म्हणाल्या, 365 दिवस आणि चौवीस तास आम्ही निवडणुकीसाठी तयार असून मध्यवधी निवडणुका झाल्यास आमची सर्व तयारी आहे. 

 

संबंधित लेख