Supriya Sule bags prestigious Parliamentarians' Award for Children | Sarkarnama

सुप्रिया सुळे यांना 'पार्लमेन्टरीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन' पुरस्कार जाहीर

मिलिंद संगई  
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

या पुरस्कारामुळे जसा आनंद झाला आहे तशीच  जबाबदारी आणखी वाढली असून दुप्पट जोमाने  काम करण्यास बळ मिळाले आहे.

- सुप्रिया सुळे

बारामती शहर: ‘युनिसेफ’ आणि ‘  पार्लमेन्टरीयन्स   ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘ पार्लमेन्टरीयन्स  अवार्ड फॉर चिल्ड्रन  ’ हा पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. लहान मुलांसाठी चांगले काम करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार देण्यात येतो . 

सुप्रिया सुळे यांनी संसदेत आणि संसदेबाहेर लहान मुलांसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . सुप्रिया सुळे यांनी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात  आक्रमक भूमिका घेतलेली आहे . महाराष्ट्रात देखील २०११ पासून' बेटी बचाव' अभियान यशस्वीपणे  राबविले आहे . लोकसभेत लहान मुलांच्या समस्यांवर  त्यांनी सर्वाधिक ६४ प्रश्न उपस्थित केले असून  बालहक्क , कुपोषण अशा विषयांवर त्यांनी सातत्याने  लहान मुलांच्या बाजूने भूमिका मांडली  आहे . 

राज्यभरातील विशेष मुले आणि अंगणवाड्या तसेच शालेय शिक्षण आणि शिक्षकांसाठी सातत्याने सुप्रिया सुळे कार्यरत आहेत.  कर्णबधीर मुलांसाठी आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी   सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतील स्टार्की फौंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, टाटा ट्रस्ट, तसेच पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून  श्रवणयंत्रे बसविण्याचा उपक्रम त्या   राबवित आहेत .

 सुप्रिया सुळे यांनी पुण्यात विशेष मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या श्रवणयंत्रे  बसविण्याच्या उपक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकोर्ड बुक’ने दखल घेतली. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल 4846  जणांना श्रवणयंत्रे बसविण्यात आली. 

आपल्या मतदार संघातील मुली  केवळ शाळा दूर अंतरावर आहे म्हणून  शिक्षणापासून वंचित राहू नयेत  यासाठी दरवर्षी सुप्रिया सुळे या विद्यार्थिनींना सायकली वाटप करतात. गेल्या वर्षी पंधरा हजार तर यावर्षी दहा हजाराहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

 याशिवाय अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि अन्य कशाचीही कमी पडू नये यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत ‘युनिसेफ’ आणि ‘ पार्लमेन्टरीयन्स ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘ 'पार्लमेन्टरीयन्स  अवार्ड फॉर चिल्ड्रन'  ’ हा पुरस्कार सुळे यांना जाहीर झाला आहे. 

 

संबंधित लेख