supriya sule about his marrage | Sarkarnama

माझ्या लग्नासाठी बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेतला, हीच महाराष्ट्राची 'ब्युटी' आहे!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

राजकीय भांडणे केवळ सत्तेसाठी नसतात.

कोपरगाव (नगर) : "माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री जयललिता, यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकीय लोक वैयक्तिक संबंध आणि राजकीय मतभेद, यात गल्लत करीत नाहीत. माझे लग्न जमविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला, हीच महाराष्ट्राची "ब्युटी' आहे. मला दु:ख एवढ्याचे वाटते, की तुम्हाला यातले अंतर का समजत नाही? हे आपल्या लोकशाहीचे अपयश आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंगेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

राजकीय भांडणे केवळ सत्तेसाठी नसतात. वैयक्तिक संबंध कितीही चांगले असले, तरी तत्त्वाची लढाई कधीच सोडली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. गौतम बॅंकेच्या सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेले भाष्य कोणीच ऐकले नाही; पण त्याचा विपर्यास करीत ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाने तुम्हाला दोन वेळा राज्यसभा दिली, मंत्री केले. राजीनामा देताना त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, हे दुर्दैवी आहे. निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व बाबींचा वापर करू, अशी भाषा आजपर्यंत राज्यातील कुठल्याही मुख्यमंत्र्याने केली नाही. तसे भाष्य करणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत.'' 

संबंधित लेख